मुंबई - काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(CM Yogi Adityanath)यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तरप्रदेशमध्ये येत आहेत. परंतु कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(NCP Nawab Malik) यांनी केला आहे.
नवाब मलिक म्हणाले की, कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात आल्याचे भयावह चित्र अख्खा देशानं आणि जगानं पाहिलं. यामुळे योगी सरकारच्या कारभाराचे वाभाडे निघाले. उत्तर प्रदेशातील हे अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असे चित्र उभे करण्याचा भाजपचा प्लॅन तयार असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितले.
तसेच चार वर्षांत योगींनी आपल्या कार्यकाळात फक्त राज्यात घृणा निर्माण केली आहे. सर्वसामान्य जनतेला फायदा होईल अशी एकपण योजना राबवण्यात आली नाही. कोरोनात फक्त सरकारच्या तिजोरीतील निधी मोठमोठ्या जाहिरातींवर खर्च करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये आपला पराभव होणार हे भाजप आता समजून चुकली आहे. त्यामुळेच भाजप चिंताग्रस्त झाली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाला पराभव पत्करावा लागणार हे निश्चित आहे असा टोला नवाब मलिकांनी भाजपाला लगावला आहे.
PM नरेंद्रमोदी, अमित शाहंची भेट
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरुवारी अचानक दिल्लीत पोहोचले. त्यांनी सायंकाळी चार वाजता गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. याशिवाय, काही केंद्रीयमंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही ते भेटणार आहेत. आज ते पंतप्रधानांच्या निवासस्थानी नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊ शकतात. यानंतर ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही भेटू शकतात.
नेमकं काय घडतंय?
संघाचा योगींना पाठिंबा बातम्यांतून जे समोर येत होते त्याच्या अगदी उलट असे चित्र प्रत्यक्षात उलगडताना दिसत आहे. अध्यात्म सोडून नंतर राजकारणात आलेले भगवे वस्त्रधारी साधू योगी आदित्यनाथ यांना संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. मोदींच्या नंतर त्यांची जागा घेऊ शकणारे प्रमुख नेते म्हणून योगी यांच्याकडे संघ परिवार पाहत आहे. कल्याणसिंग यांच्याप्रमाणे योगी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची चूक करायची नाही असा संघाचा मानस दिसतो. १९९९ मध्ये वाजपेयी यांच्यामुळे कल्याणसिंग यांना बाजूला करण्यात आले. २००२ मध्ये भाजपने त्याची मोठी किंमत मोजली. पुन्हा सत्ता मिळवायला पक्षाला नंतर १५ वर्षे वाट पाहावी लागली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना उत्तर प्रदेशात पाठविण्याचे घाटत होते; पण संघाने पुन्हा चूक न होऊ देण्याचा निर्धार केला होता. पुढची निवडणूक केवळ योगींच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, असे संघाने स्पष्ट करून टाकले. तडजोड म्हणून दिल्लीची पसंती असलेले नेते ए. के. शर्मा यांना मंत्री पद द्यावे; पण उप-मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, हेही ठणकावून सांगण्यात आले. असे म्हणतात की, अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात सुरक्षित अंतर राखायचे ठरवले आहे. पंजाबात भाजपची स्थिती सैरभैर आहे, अकाली दल एनडीएतून बाहेर पडले आहे, तेथे शहा जास्त लक्ष देतील अशी शक्यता आहे.