भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 04:04 PM2024-10-05T16:04:56+5:302024-10-05T16:09:46+5:30

BJP strategy in jammu and kashmir: तब्बल दहा वर्षांनी जम्मू काश्मिरात निवडणूक झाली. ८ ऑक्टोबरला निकाल येतील, पण त्याआधीच भाजपाने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यात पाच आमदार जे राज्यपाल नियुक्त करणार आहेत, ते महत्त्वाचे ठरणार आहेत. 

BJP's big strategy in Jammu and Kashmir! Five MLAs appointed by the Lieutenant Governor bjp attempt to gain power | भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

Jammu and Kashmir election BJP: केंद्र शासित प्रदेश झाल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीर विधानसभेसाठी निवडणूक झाली. ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. पण, भाजपाने काश्मीर खोऱ्यात सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने अनुभवी नेते राम माधव यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. भाजपा सध्या दोन आघाड्यांवरील रणनीतीवर काम करत असून, यातील एक पाच आमदारांची आहे. जम्मू काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी निवडणूक झाली. पण विधानसभेतील सदस्य संख्या ९५ असणार आहे. वरचे पाच सदस्य हे उपराज्यपाल नियुक्त करणार आहेत. याच आमदारांमुळे भाजपाला बहुमतांचा आकडा पार करण्याचा विश्वास आहे. (LG Manoj Sinha to nominate five MLAs jammu and Kashmir Assembly)

रिपोर्टनुसार, जम्मू काश्मीर विधानसभेत उप राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पाठवली जाणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेल्या शिफारशीनुसार उप राज्यपाल त्या सदस्यांना नियुक्त करतील. ही प्रक्रिया जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन अधिनियम २०१९ मध्ये दुरुस्ती केल्यानंतर पहिल्यांदा केली जाणार आहे. या कायद्यात २६ जुलै २०२३ रोजी दुरुस्ती करण्यात आली होती. 

जम्मू काश्मीर विधानसभा सदस्यांची संख्या होईल ९५

उप राज्यपालांनी ५ सदस्यांची नियुक्ती केल्यानंतर जम्मू काश्मीर विधानसभेतील आमदारांची संख्या ९५ होईल. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी बहुमताचा आकडा ४८ इतका होईल. उपराज्यपाल ८ ऑक्टोबरनंतर या पाच सदस्यांची नियुक्ती करणार असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयाला आता काँग्रेसने विरोध केला आहे. काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रमन भिल्लांनी आरोप केला आहे की, आमदारांच्या नियुक्तीमुळे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होईल. 

दोन महिला आणि तीन काश्मिरी पंडित

नियमानुसार उपराज्यपाल दोन महिला आणि तीन काश्मिरी पंडितांना विधानसभेचे सदस्य म्हणून नेमू शकतात. या पाच आमदारांना ते सर्व अधिकार असतील, जे निवडून आलेल्या आमदारांना असतील. म्हणजे बहुमत चाचणीवेळी त्या आमदारांना मतदान करता येईल. त्यामुळे काँग्रेसने याला विरोध केला आहे. 

४३ आणि ५; भाजपाचा सत्ता स्थापनेची रणनीती काय?

जम्मू काश्मीर विधानसभेच्या एकूण ९० जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील ४३ जागा जम्मू विभागातील आहेत, तर ४७ जागा या काश्मीर विभागातील आहेत. जम्मू विभागात भाजपाची स्थिती मजबूत मानली जात आहे. त्यामुळे जम्मूमध्ये चांगले यश मिळण्याची आशा भाजपाला आहे. त्यात अपक्ष आमदारांना आपल्या बाजूने करण्यासाठी आतापासूनच भाजपा कामाला लागली आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

२०१४ मध्ये राम माधव यांच्यावरच भाजपाने जम्मू काश्मिरची जबाबदारी सोपवली होती आणि त्यांनी पीडीपी सोबत सर्व गोष्टी जुळवून भाजपाला सत्तेत बसवण्याचे काम केले. आताही त्यांच्यावरच जबाबदारी सोपवली गेली आहे. भाजपाला आशा आहे की, पक्ष स्वबळावर ४३ जागांपर्यंत मजल मारेल. त्यात पाच आमदारांमुळे बहुमत गाठणे शक्य होईल. आणि अपक्ष आमदारांच्या मदतीन काश्मिरात सरकार स्थापन करता येऊ शकेल. पण, आता ९० पैकी भाजपाला किती जागा मिळतात यावर बरीच मदार असणार आहे, त्यामुळे निकालांची उत्सुकता वाढली आहे. 

Web Title: BJP's big strategy in Jammu and Kashmir! Five MLAs appointed by the Lieutenant Governor bjp attempt to gain power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.