"उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे. पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानीच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे," असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना पटोले यांनी हा आरोप केला."अंबानी यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी सापडली. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच त्यांची वैयक्तीक सुरक्षा व्यवस्था असताना ती गाडी तिथपर्यंत पोहचलीच कशी? हा प्रश्न आहे. २००९ साली अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घात पात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचा मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता," असेही पटोले यावेळी म्हणाले. राज्यात व देशात असलेल्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजपनेच या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला असेही पटोले म्हणाले.यापूर्वी मिहानवरून साधला निशाणा"मिहान प्रकल्पामधील २३० एकर जमिनीवर रामदेवबाबांचा पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होता. रामदेवबाबांना ही जमीन ६६ वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली होती. या उद्योगामुळे ५० हजार रोजगार निर्मिती होईल तसेच दररोज ५ हजार कोटींचा कच्चा माल खरेदी केला जाईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु चार वर्षे झाली तरी अद्याप या जागेवर पतंजलीचा उद्योग उभा राहिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या रिलायंस डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये २८९ एकर जमीन देण्यात आली आहे. या उद्योगातूनही प्रत्यक्ष २००० तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगार निर्मिती होईल असा दावा करण्यात आला होता पण हा प्रकल्पही अद्याप उभा राहिलेला नाही," असं म्हणत यापूर्वी पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला होता.