"राज्यांनी कर कमी करावा ही भाजपची मागणी लोकांची दिशाभूल करणारी" नाना पटोलेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 04:20 PM2021-07-15T16:20:02+5:302021-07-15T16:23:43+5:30

Nana Patole: महागाई व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांनी आज मलबार हिल येथील हँगिंग गार्डन येथून सायकल रॅलीने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

"BJP's demand that states should reduce taxes is misleading the people," said Nana Patole | "राज्यांनी कर कमी करावा ही भाजपची मागणी लोकांची दिशाभूल करणारी" नाना पटोलेंचा टोला

"राज्यांनी कर कमी करावा ही भाजपची मागणी लोकांची दिशाभूल करणारी" नाना पटोलेंचा टोला

googlenewsNext
ठळक मुद्देमोदी सरकारकडून इंधनावरील करातून जनतेची राजरोस लूटइंधन दरवाढ, महागाई, काळे कृषी कायदे, मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्यावर राज्यपालांना निवेदनइंधन दरवाढ व महागाईविरोधात प्रदेश काँग्रेस राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करत आहे

मुंबई - केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार इंधन, गॅस, खाद्यतेल डाळींची महागाई करून जनतेला आर्थिक कमजोर करत आहे. कोरोनामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली असताना महागाईच्या ओझ्याखाली गोरगरिब, मध्यमवर्ग, नोकरदारही पिचला गेला आहे. इंधनावरील कराच्या रुपाने केंद्र सरकार आपली झोळी भरत असून दररोजच्या महागाईने जनतेचे मात्र कंबरडे मोडले असून मोदी सरकार मात्र कुंभकर्णासारखे झोपले आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ( Nana Patole said, "BJP's demand that states should reduce taxes is misleading the people")

महागाई व इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस नेत्यांनी आज मलबार हिल येथील हँगिंग गार्डन येथून सायकल रॅलीने राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. इंधन दरवाढ, महागाईबरोबरच, मराठा, ओबीसी आरक्षण आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना निवदेन दिले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असतानाही भारतात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती दररोज वाढत आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत. शेजारच्या राष्ट्रांना भारत पेट्रोल, डिझेल ३० रुपये लिटरने देत असून आपल्याच नागरिकांना मात्र पेट्रोलसाठी १०७ रुपये तर डिझेलसाठी ९६ रुपये मोजावे लागतात. इंधनावरील एक्साईज ड्युटी, रस्ते विकास सेस व कृषी सेसच्या माध्यमातून केंद्र सरकार भरसाठ कमाई करत आहे. सेसमधून राज्य सरकारला एक रुपयाही मिळत नाही. गत ७ वर्षात इंधनावरील करातून मोदी सरकारने तब्बल २५ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे.

इंधनाचे भाव दररोज वाढत असताना त्यातून केंद्रातील भाजपा सरकार जनतेला काहीच दिलासा देत नाही उलट भारतीय जनता पक्षाचे नेते राज्य सरकारने कर कमी करावेत असा उफराटा सल्ला देत आहेत. राज्य सरकारचे इंधनावरील कर हे केंद्र सरकारपेक्षा फारच कमी आहेत. केंद्र सरकार कररुपाने आपली तिजोरी भरत आहे. उलट राज्य सरकारच्या हक्कांचा जीएसटी परतावाही केंद्र देत नसतानाही इंधन दरवाढीतून जनतेला दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर ढकलणे ही भाजपाकडून केली जाणारी दिशाभूल आहे.

यावेळी विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. कुणाल पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, आ. अमिन पटेल,  आ. झिशान सिद्दीकी, आ. अभिजित वंजारी, आ. राजेश राठोड, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, अनिस अहमद, सरचिटणीस राजन भोसले, प्रा. प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

इंधन दरवाढ व महागाईविरोधात प्रदेश काँग्रेस राज्यभर विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा निषेध करत आहे. महसुल विभागीय आयुक्त मुख्यालयी सायकल रॅली काढण्यात आली, महिला काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवून महागाईचा निषेध केला. जिल्हा, तालुका स्तरावरही आंदोलन करुन सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या सह्यांची मोहिम राबवण्यात आली. युवक काँग्रेस, एनएसयुआय, सर्व फ्रंटल व सेलच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या आंदोनात सहभाग घेतला. ७ जुलैपासून सुरु असलेले हे आंदोलन १७ जुलैपर्यंत चालू राहणार आहे.     

Web Title: "BJP's demand that states should reduce taxes is misleading the people," said Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.