भाजपचे मिशन हरियाणा! पंतप्रधान मोदी किती घेणार सभा, कोणते मुद्दे असणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 11:25 AM2024-09-10T11:25:23+5:302024-09-10T11:28:29+5:30
PM Modi Rallies in Haryana Assembly election 2024 : हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पारा हळूहळू वाढत आहे. पंतप्रधान मोदींच्याही सभा होणार असून, भाजपकडून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला जाणार आहे.
PM Modi Haryana Assembly election 2024 : ५ ऑक्टोबरला हरियाणात विधानसभेची निवडणूक होत असून, प्रचाराचा पारा चढू लागला आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दिसत असली, तरी काही प्रादेशिक पक्ष आणि आपमुळे अनेक ठिकाणी निवडणूक अटीतटीची होणार, अशी चर्चा आहे. भाजपनेही निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. काही मुद्द्याभोवती भाजपने रणनीती आखली असून, प्रचारात त्यावरच भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या पाच सभा?
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरियाणात पाच प्रचारसभा होणार आहेत. पंतप्रधान मोदी प्रचारात भाजपचा प्रमुख चेहरा असणार आहेत. मोदी यांच्या प्रचारसभांचे वेळापत्रक जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती आहेत.
पंतप्रधान मोदी १४ सप्टेंबर रोजी हरियाणा विधानसभा प्रचाराचा श्रीगणेशा करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी कुरुक्षेत्रमध्ये पंतप्रधान मोदी यांची पहिली प्रचारसभा होणार आहे. याच परिसरातील लाडवा विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. ते कुरूक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून खासदारही राहिलेले आहेत.
भाजप प्रचारात कोणत्या मुद्द्यांवर देणार जोर?
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप स्थानिक मुद्द्यांवर जोर देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे भाजपकडून भ्रष्टाचाराचा मुद्दाही प्रचारात आणला जाणार आहे. काँग्रेसकडून भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात असलेल्या आमदारांना तिकीट दिले गेले, त्यावरूनही लक्ष्य करण्याची भाजपची रणनीती असल्याचे समजते.
बिगर जाट जातींवर भाजपचे असणार लक्ष
विधानसभा निवडणुकीत जातीय समीकरणे लक्षात घेत भाजपकडून बिगर जाट जात समूहांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. भाजपने आतापर्यंत जाट समुदायातील १३ जणांना उमेदवारी दिली आहे. त्यात वाढ होऊ शकते, कारण २३ जागांसाठी उमेदवारांची घोषणा झालेली नाही. या मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यापूर्वी भाजपकडून जातीय समीकरणांचा विचार केला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शेतकरी आणि महिला या दोन घटकांकडे लक्ष दिले जाणार आहे. २४ पिकांची एमएसपी दराने खरेदी, सरकारी नोकऱ्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहारांवर अंकुश आदी मुद्दे भाजपकडून प्रचारात मांडले जाण्याची शक्यता आहे.