अजित पवारांविरोधात हक्कभंग; भाजपाची सूचना विधानसभा उपाध्यक्षांनी स्वीकारली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 05:41 AM2021-03-05T05:41:53+5:302021-03-05T05:42:32+5:30
Ajit Pawar news : मागील अधिवेशनात दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वित्तमंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाची सूचना मांडली. विशेष म्हणजे, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ती स्वीकारल्याचे जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्यासंदर्भात वित्तमंत्री अजित पवार यांनी मागील अधिवेशनात दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वित्तमंत्र्यांविरुद्ध हक्कभंगाची सूचना मांडली. विशेष म्हणजे, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी ती स्वीकारल्याचे जाहीर केले.
विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्राचा सर्वंकष विकास साधायचा असेल तर वैधानिक विकास मंडळाची कवचकुंडले असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र राज्य सरकार यादृष्टीने गंभीर नाही, ही अतिशय चिंतेची बाब आहे. या विभागावर निधी वितरणासंदर्भात अन्याय होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्र्यांनी वैधानिक विकास मंडळे स्थापन करण्याबाबत दिलेले आश्वासन न पाळणे व ही मंडळे स्थापन न करणे हा या सार्वभौम सभागृहांच्या विशेषाधिकाराचा भंग असल्याचे सांगत हे प्रकरण विधानसभेच्या विशेष हक्क समितीकडे पाठविण्याची मागणी आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
आरोग्य विभागाच्या ३२३ रुग्णालयांचे फायर ऑडिट
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील ५६७ रुग्णालयांपैकी ३२३ आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करण्यात आले आहे. १७० संस्थांचे अंदाज आराखडे तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कार्यवाही सुरू असून, त्यातील ७४ संस्थांचे अंदाज आराखडे तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेच्या लेखी प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
सदस्य अतुल भातखळकर यांनी याबाबतचा लेखी प्रश्न विचारला होता. टोपे यांनी म्हटले आहे, की ३२३ आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट झाले असून, १७० संस्थांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाज आराखडे तयार करण्यासाठी मागणी केली आहे. त्यातील ७४ अंदाज आराखड्यांसाठी जिल्हा नियोजन समिती व राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.