लाेकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ओबीसींच्या आरक्षणासाठी आवश्यक असलेला इम्पेरिकल डाटा केंद्र शासनाकडे गोपनीय आहे, तरीही २०१९ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांनी डाटा पाहिल्याचे ते सांगतात. ही बाब पाहता सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इम्पेरिकल डाटाची माहिती द्यावी, त्यासाठी गोपनीयतेचा अडसर का, असा सवाल करताना भाजप, आरएसएसला देशातील ओबीसी, एससी, एसटी समूहाचे आरक्षण संपवायचे आहे, त्या दिशेनेच त्यांचे काम सुरू आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खामगावात केला. जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी प्रदेश सचिव धनंजय देशमुख यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.
कोणत्याही परिस्थितीत आपणाला ऊर्जा खाते नको आहे. भाजपच्या सत्तेच्या काळात त्या विभागात प्रचंड अनागोंदी करून ठेवली आहे. निस्तरण्यासाठी पूर्ण वेळ तसेच त्या खात्याला न्याय देणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. आपणाला ते जमणार नाही, त्यामुळे हायकमांडने मंत्रीपद दिल्यास ते ऊर्जा खाते देऊ नये, अशी विनंती करणार असल्याचेही पटोले म्हणाले.
विधानसभा अधिवेशनाचा कालावधी हा कमी असू नये; या मताचा मी आहे मात्र, भाजपच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला आहे. तो झाकण्यासाठी कमी कालावधीच्या अधिवेशनाची संधी त्यांना दिली जाते की काय, अशी शंकाही यानिमित्ताने व्यक्त होत असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रदेश सचिव धनंजय देशमुख, उपाध्यक्ष संजय राठोड, सरचिटणीस श्याम उमाळकर, आमदार राजेश एकडे, रामविजय बुरूंगले, ज्ञानेश्वर पाटील, स्वाती वाकेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार, किरण देशमुख, मो. बद्रुज्जमा, नागपूरचे पांडे उपस्थित होते.