राजकारण तापले : भाजपच्या स्टारप्रचारकांना काँग्रेसही देणार कांटे की टक्कर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 09:14 PM2019-04-08T21:14:51+5:302019-04-08T21:17:02+5:30
पुण्यात सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असून भाजपच्या प्रचाराला काँग्रेसही स्टार प्रचारक आणून उत्तर देण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरात प्रचाराची धुळवड बघायला मिळेल यात शंका नाही.
पुणे : पुण्यात सध्या निवडणुकीचे वातावरण तापले असून भाजपच्या प्रचाराला काँग्रेसही स्टार प्रचारक आणून उत्तर देण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरात प्रचाराची धुळवड बघायला मिळेल यात शंका नाही.
पुण्यात भाजपच्या गिरीश बापट यांच्यासमोर काँग्रेसच्या मोहन जोशी यांचे आव्हान आहे. दोघेही नेते ज्येष्ठ असल्यामुळे प्रचार कशा पद्धतीने होणार याबाबत चर्चा रंगत होत्या. नाव लवकर जाहीर करत भाजपने सुरुवातीला प्रचारात आघाडीही घेतली होती. मात्र जोशी यांनीही आता प्रचाराला जोर लावला आहे. त्यामुळे दोघेही नेते शहरात पायाला भिंगरी लावून फिरताना दिसत आहेत. आज शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन याही पुण्यात प्रचार करताना दिसणार आहेत.
काँग्रेसकडे अजून तशी नावे निश्चित झाली नसली तरी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचा रोड शो करण्याची मागणी नेत्यांनी केली आहे. शिवाय काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनाही शहरात आणण्याचा महिला काँग्रेसचा प्रयत्न आहे.दोनही पक्ष राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेते आणि चेहरे आणणार असतील तर शाब्दिक युद्ध आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फ़ैरी आगामी काळात पुण्यात झडतील. त्यामुळे पुणेकरांचे मनोरंजन होणार आहे. पण ते कोणाचे म्हणणे गांभीर्याने घेवून मतदान करतील यासाठी मात्र २३मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.