लखनौ - विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. (Uttar Pradesh elections 2022) भाजपाने राज्यातील स्थानिक पक्षांसोबत असलेल्या आघाडीला मजबूत करतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खूश करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. (BJP) या माध्यमातून सुमारे एक लाख कार्यकर्त्यांची सरकारपासून पक्षसंघटनेपर्यंत नियुक्ती करण्याची योजना भाजपाने आखली आहे. (BJP's strong preparations for Uttar Pradesh elections, will appoint one 1 lakh workers in various departments)
भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यकर्त्यांना राज्य अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती आयोगासह अन्य आयोग, पालिका, बोर्ड आणि समित्यांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. संघटनेमध्ये पक्षाच्या विविध आघाड्या, विभाग आणि प्रकल्पामधील मंडळ स्तरांपर्यंत नियुक्त्या केल्या जाणार आहेत. सर्व काही व्यवस्थित झाले तर पहिल्या टप्प्यामध्ये जुलै महिन्यापर्यंत संघटना आणि सरकारमधील विविध पदांवर सुमारे एक लाखांहून अधिक कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री बी.एल.संतोष यांनी लखनौला भेट देत पदाधिकाही आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या तेव्हा काही मंत्री आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांना समावून घेण्याबाबत आणि नेत्यांच्या दावेदारीबाबत सरकार आणि पक्षसंघटनेतील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. निवडणूक तोंडावर आली असल्याने या पदांवर नियुक्त्या करताना जातीय आणि विभागीय समतोल राखला जाणार आहे.
भाजपाकडून कार्यकर्त्यांना प्रसारमाध्यम विभाग, सुशासन आणि केंद्र-राज्य समन्वय विभाग, योजना शोध विभाग, प्रसारमाध्यम संपर्क विभाग, राजकीय फिडबॅक विभाग, राजकीय कार्यक्रम आणि बैठक विभाग यामध्ये समायोजित करेल. या विभागांशिवाय कार्यकर्त्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव विभाग, साहित्य आणि प्रकाशन विभाग, व्यवस्थापन विभाग, समन्वय विभाग, निवडणूक आयोगासोबत समन्वय राखणारा विभाग, सोशल मीडिया विभाग, आयटी विभाग, आजीवन सहयोग निधी विभाग, विधी आणि न्याय विभाग, जिल्हा कार्यालय आणि निर्माण विभाग, वाचनालय, लायब्रेरी रीडिंग रूम, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, नमामि गंगे प्रकल्प, राष्ट्रीय सदस्यता अभियान राष्ट्रीय महासंपर्क अभियान आदींमध्ये कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची योजना भाजपाने आखली आहे.