मराठा आरक्षणाबाबत भाजपाची दुतोंडी भूमिका उघडी पडली, अशोक चव्हाणांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 05:18 PM2021-08-12T17:18:00+5:302021-08-12T17:20:54+5:30
Ashok Chavan : अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपाच्या या दोन्ही नेत्यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही.
मुंबई : आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत महाराष्ट्रातील भाजपा खासदारांनी संसदेत बाळगलेल्या मौनातून मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा पर्दाफाश झाल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.
अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपाच्या या दोन्ही नेत्यांना आता मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना अधिकार राहिलेले नसताना तत्कालीन भाजपा सरकारने मराठा आरक्षण दिले, हे सिद्ध झाले आहे. शिवाय ती चूक आता दुरुस्त होत असताना ५० टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत महाराष्ट्रातील भाजपा खासदारांनी चकार शब्दही काढला नाही.
खा. संभाजी राजे यांनी याबाबत राज्यसभेत बोलण्यासाठी वेळ मागूनही दुर्दैवाने त्यांना वेळ देण्यात आली नाही. शेवटी विरोधी पक्ष आक्रमक झाले व त्यानंतर त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. या साऱ्या प्रकारातून मराठा आरक्षणाबाबत भाजपाची दुतोंडी भूमिका उघडी पडली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही अशोक चव्हाण यांनी कडाडून टीका केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व्यवस्थित वाचला पाहिजे. ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्याची मागणी ही सबब नाही. याच आरक्षण मर्यादेमुळे मराठा आरक्षण फेटाळले गेले, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय ही मागणी राज्याने आता केलेली नसून, मागील अनेक महिन्यांपासून आम्ही याबाबत सातत्याने बोलतो आहोत. संसदेत राज्यांचे मागासलेपण निश्चित करण्याचे अधिकार पुन्हा बहाल केले जात असताना त्याचवेळी ही मर्यादा देखील शिथिल करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने लावून धरली.
त्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे, खा. अधिर रंजन चौधरी, खा.डॉ. अभिषेक मनू सिंघवी, खा. बाळूभाऊ धानोरकर, शिवसेनेचे खा. संजय राऊत, खा. विनायक राऊत, खा. प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण यांनी भक्कमपणे बाजू मांडली. मराठा आरक्षणाच्या संसदेतील लढ्याचे ते योद्धे आहे. पण खा. संभाजी राजे यांचा अपवाद वगळता भाजपचे इतर खासदार हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून बसले होते. लोकसभा व राज्यसभेत काय घडले, ते उभ्या महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिले. आता भाजपने मराठा समाजाची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याला बळी पडणार नाहीत, असेही अशोक चव्हाण म्हणाले.