मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे Eknath khadse यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.खडसेंच्या प्रवेशाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, गेली तीन साडे तीन दशके भाजपामध्ये असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याचे मला कळवले आहे. ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच खडसे यांना मानणारे, त्यांचे पाठिराखे असलेले नेते आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.
एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलण्यात आलं होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं.
महाविकास आघाडीच्या कुटुंबात आल्याचं स्वागत -मुख्यमंत्री
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने आनंद आहे. त्यांचे महाविकास आघाडीच्या कुटुंबात स्वागत आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना काय मिळणार?
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल, इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे, यात शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं शरद पवारांनी सांगितल्यामुळे खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले होते.