मुंबई : देशातील जवानांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले, ते सर्व जगाने पाहिले. मात्र, काँग्रेसच्या एका वाचाळवीराने जवानांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तो वाचाळवीर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय. जनतेने आपला रोष त्याला मतदानातून दाखवून द्यावा आणि त्याला घरी बसवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारासाठी अंधेरी (पूर्व) सुभाषनगर येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. युती सरकारने गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईचा गतिमान विकास होतो आहे. मुंबईत एक लाख कोटी रुपये खर्च करून २०० किमीचे मेट्रोचे जाळे उभे राहात आहे. रेल्वेच्या विकासासाठी केंद्र सरकारने साठ हजार कोटी निधी दिला आहे. ५०० फूट घरांना मालमत्ता करात सूट, २०११ पर्यंतच्या पात्र झोपड्यांना ३०० फुटांचे मोफत घर, कोस्टल रोडची निर्मिती याचा मोठा फायदा मुंबईतील नागरिकांना होणार आहे.काँग्रेसचा अर्धा वेळ मोदींवर टीका करण्यातनिवडणुका जवळ आल्या की, काँग्रेस ‘गरिबी हटाव’चा नारा देते, पण सामान्य माणसांची गरिबी त्यांनी हटविली नाही. राहुल गांधी म्हणतात, ७२ हजार रुपये देणार. त्यांना विचारले कसे देणार? तर त्यांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. काँग्रेसची भाषणे आणि आश्वासने पोकळ आहेत. त्यांचा अर्धा वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात जातो, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या प्रचारार्थ दहिसरमधील अशोकवन येथे मुख्यमंत्री बोलत होते.‘आमच्या काळात मुंबईकर सुरक्षित’२००८ साली आघाडी सरकारच्या काळात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाने मुंबई हादरली होती. मात्र, आमच्या गेल्या साडेचार वर्षांच्या काळात मुंबईकर सुरक्षित राहून मुंबईत एकही बॉम्बस्फोट झाला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
'जवानांच्या शौर्यावर संशय घेणाऱ्या वाचाळवीराला आता घरी बसवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 5:51 AM