कर्नाटक (Karnataka) मध्ये बीएस येडीयुराप्पा यांना (Former CM BS Yediyurappa) मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले. निजद-काँग्रेसकडून सत्ता खेचून आणत येडीयुराप्पांनी कर्नाटकात सत्ता स्थापन केली होती. मात्र, त्यांना दोन वर्षातच सत्ता सोडावी लागली. अंतर्गत विरोध आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरबदल यामुळे त्यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली खरी परंतू त्यांचे जवळचे असलेले बोम्मई यांना मुख्यमंत्री पद मिळाल्याने सरकारमध्ये त्यांचे वजन पूर्वीसारखेच राहणार आहे. (Yediyurappa will get all facilities and protocols like cabinet minister in Karnataka.)
मुख्यमंत्री पद गेले तरी येडीयुराप्पांना त्या सर्व सुविधा मिळणार ज्या एका राज्य कॅबिनेट मंत्र्याला कर्नाटकमध्ये मिळतात. राज्य कॅबनेट मंत्र्याला मिळणाऱ्या साऱ्या सुविधांबरोबरच त्यांच्यासाठी ज्या प्रोटोकॉलचे पालन केले जाते ते देखील येडीयुराप्पांना देण्यात आला आहे. कर्नाटक सरकारने यासाठी एक खास आदेश काढला आहे.
26 जुलैला बीएस येडीयुराप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. कर्नाटकमध्ये भाजपा सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली होती. कर्नाटकच्या लोकांसाठी खूप काम करायचे आहे, असे ते म्हणाले होते. यावेळी त्यांनी मी नेहमी अग्निपरीक्षेतून गेल्याचे सांगितले.
येडीयुराप्पा यांच्यानंतर त्यांचेच खंदे समर्थक बसवराज बोम्मई यांच्या हाती कर्नाटकची सत्ता देण्यात आली. बोम्मई यांनी मंत्रिमंडळ फेरबदल करत 29 मंत्र्यांना शपथ दिली. त्यांनी आपल्याकडे अर्थ खाते ठेवले आहे. अराग जनेंद्र यांना गृहमंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.