मुंबई : कोरोनाच्या भीषण संकटानंतर सोमवारी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यानंतर सर्वच स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पाचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी स्वागत केले असून देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे, असे म्हटले आहे. (Budget 2021 Latest News and updates)
भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आपली प्रतिक्रीया दिली. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाची आर्थिक स्थिती मजबूत करणारा आहे. हा अर्थसंकल्प देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे. तसेच, देशाला आर्थिक विकासाकडे घेऊन जाणारा हा समतोल आणि देशाला प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे, असे नारायण राणे यांनी सांगितले.
दुसरीकडे, भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आरोग्य, आर्थिक आणि पायाभूत सुधारणांस विकास, नाविन्यता आणि विकास अशा सहा सूत्रांवर अर्थसंकल्प सादर केला गेला आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांकरता मोठी तरतूद करण्यात आली. मासेमारीसाठी मोठी तरतूद करण्यात आली. शेतकऱ्यांना 16 लाख कोटी रुपयांचे आपत्कालीन कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण पायाभूत सेवा क्षेत्रासाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली.सर्व क्षेत्रातील सर्व कामगारांना किमान वेतन कायदा लागू करण्यात आला. देशाच्या इतिहासात कामगारांसाठी घेण्यात आलेला क्रांतिकारक निर्णय आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.