मुंबई : केंद्र सरकारने सन 2021 - 22 चा सादर केलेला अर्थसंकल्प हा कृषीक्षेत्राला नवसंजीवनी देणारा, मजूर कामगार गरिबांना आर्थिक न्याय देणारा, सामाजिक आणि आर्थिक समतेकडे भारताचे अर्थचक्र अग्रेसित करणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले दिली. तसेच, सर्व समाज घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प देशाला दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन रामदास आठवले यांनी केले आहे. (Budget 2021 Latest News and updates)
यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, कामगार, दलित, अल्पसंख्यांक अशा सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्याच्या महत्वपूर्ण विचारांचे सूत्र प्रकर्षाने दिसत आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात सर्वांचा जीव वाचविण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय झाला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा मोठा आपला देश आहे. या प्रचंड लोकसंख्येचा जीव कोरोनाच्या संकटात होता. त्या सर्वांना जीवदान देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
याचबरोबर, आता यंदाच्या क्रांतिकारी अर्थसंकल्पातून सर्व समाज घटकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना आणि मजुरांना कामगारांना तर या अर्थसंकल्पातून नवसंजीवनी देण्यात आली आहे. दूरदृष्टी असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सामान्य गरीब आणि दलित मागासवर्गीय वर्गाचे होत लक्षात घेऊन अत्यंत चांगला आणि आर्थिक बळ देणारा, आत्मनिर्भर करणारा अर्थसंकल्प सादर केला आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
दरम्यान, आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या आणि ज्यांना निवृत्तीवेतन मिळते त्यांचा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, भारत पेट्रोलियम, आयडीबीआय बँक आणि एअर इंडिया यामध्ये निर्गंतवणूक करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.