"शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशही झुकले"; गुलाम नबी आझाद यांनी संसदेत मोदींना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 12:30 PM2021-02-03T12:30:10+5:302021-02-03T12:42:39+5:30
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद संसदेत उमटले आहेत.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद संसदेत उमटले आहेत. राज्यसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत शेतकऱ्यांबद्दल मोदी सरकार भावनाशून्य झाल्याची टीका केली आहे. राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद ( Ghulam Nabi Azad ) यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असताना त्यांना खडेबोल सुनावले आहेत. मोदींसमोरच गुलाम नबी यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे वडील महेंद्रसिंग टिकैत यांचं उदाहरण देत सरकारवर निशाणा साधला. ( Ghulam Nabi Azad slams PM Modi in Rajya Sabha )
"शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशांनाही झुकावं लागलं होतं. त्यामुळे हे आंदोलन काही कायदे रद्द झाल्याशिवाय संपणारं नाही. सरकारने कृषी कायदे मागे घ्यायला हवेत. शेतकऱ्यांशिवाय या देशाचं काहीच होऊ शकत नाही. सरकारला शेतकऱ्यांविरोधात नव्हे, तर कोरोना आणि चीन विरुद्ध लढण्याची गरज आहे. देशासाठी जवान आणि किसान हे दोन्ही महत्वाचे आहेत", असं गुलाम नबी आझाद म्हणाले.
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सभागृहातच उपस्थित होते. मोदी यांनी आझाद यांच्या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मोदींनी आझाद यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. यात भाजपच्या काही खासदारांनी नारेबाजी करत गुलाम नबी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ; आपचे ३ खासदार निलंबित, मार्शलनं काढलं बाहेर
सभागृहाचं कामकाज सुरू होताच आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन जोरदार जुंपली. यावेळी सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं. आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन वेलमध्ये पोहोचले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली होती. गदारोळ पाहून अध्यक्षांनी त्यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली. या तिन्ही खासदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाबाहेर काढण्यात आलं.