नवी दिल्ली – नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत आहे. संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. मात्र कॅबिनेट विस्तारापूर्वी तब्बल ९ मंत्र्यांना आतापर्यंत राजीनामा देण्यात सांगितले आहे. कामगिरीच्या आधारावार मंत्र्यांना हटवणं आणि प्रमोशन देणं सुरू आहे. यावर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना(PM Narendra Modi) टोला लगावला आहे. .
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, जर परफॉरमन्स हाच निकष असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हटवलं पाहिजे. कॅबिनेट विस्तार म्हणजे डिफेक्टर एडजस्टमेंट एक्सरसाइज आहे. परफॉरमन्सच्या आधारे पहिल्यांदा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हटवलं पाहिजे. कारण चीन आपल्या जमिनीवर कब्जा करून बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गृहमंत्रिपदावरून हटवलं पाहिजे कारण मॉब लिचिंग आणि कस्टोडियल डेथ प्रकरण गंभीर आहेत. नक्षलवाद नियंत्रणाबाहेर गेला आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत धर्मेंद्र प्रधान यांनाही हटवलं पाहिजे कारण पेट्रोल-डिझेल दरवाढ नियंत्रणात ठेवण्यात ते अपयशी ठरले. अर्थव्यवस्थेच्या गैरनियोजनामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हटवायला हवं. इतकचं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पदावरून हटवलं पाहिजे कारण त्यांनी देशातील शांती भंग केली आहे असा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे.
कोणत्या मंत्र्यांचे राजीनामे?
नरेंद्र मोदी कॅबिनेट विस्तारापूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत तब्बल ९ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या विस्तारात आधीच काही मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. यात आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देबोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी या नेत्यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न
कॅबिनेटच्या नव्या विस्तारात २७ ओबीसी आणि २० एससी-एसटी समाजातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मोदींच्या नवीन कॅबिनेटमध्ये १२ मंत्री दलित समाजातील आहेत. यात प्रत्येक मंत्री विविध SC समाजातील आहे. १२ मंत्र्यांपैकी २ जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. २७ मंत्री OBC समाजातील आहेत. यात १९ मंत्री असे आहेत जे मागासवर्गीय जातीतून येतात. यादव, कुर्मी, जाट, दर्जी, कोळी अशा समाजाचा समावेश आहे. ओबीसी समाजातील ५ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं तर ८ मंत्री शेड्यूल ट्राईब्स(ST) समाजातील आहेत.
५ मंत्री वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजातील आहे. यात मुस्लीम १, शिख १, बौद्ध २ आणि १ ईसाई धर्मातील आहे. त्याशिवाय २९ ब्राह्मण, लिंगायत, पटेल, मराठा आणि रेड्डी समाजातील आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेट विस्तारात ११ महिलांचा समावेश आहे. यातील २ महिलांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल. नवीन मंत्रिमंडळ विस्तारात युवा चेहऱ्यांवर भर देण्यात आला आहे. ५० वर्षापेक्षा कमी असलेल्या १४ चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. यातील ६ जणांना कॅबिनेट मंत्री बनवलं जाईल. कॅबिनेट विस्तारानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ इतकं असेल.