- महेश सरनाईक सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या राजकारणात आपली छाप निर्माण करणाऱ्या सिंधुदुर्ग सुपुत्र माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांची बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने कोकणात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते, खासदार सुरेश प्रभू यांच्यानंतर नारायण राणे हे सिंधुदुर्गातील तिसरे केंद्रीय मंत्री झाले आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि विशेषत: कोकणावर आपली राजकीय पकड कायम ठेवण्यात राणे गेली ४० वर्षे यशस्वी ठरले आहेत. त्याचा फायदा साहजिकच कोकणच्या विकासाला झाला आहे. आता राणे केंद्रीय मंत्री झाल्याने त्याचा फायदा कोकण आणि विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे.राणे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेमधून झाली असून १९९९ साली त्यांनी मुख्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. ते दक्षिण कोकणातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्याचप्रमाणे युती सरकारमध्ये दुग्धविकास मंत्री, महसूलमंत्री ही पदे त्यांनी भूषविली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदावर सलग सहा वर्षे राहण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.शिवसेनेला रामराम करून काँग्रेसमध्ये दाखल झाल्यावर ९ वर्षे ते राज्याच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री आणि उद्योगमंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. त्यानंतर २०१४ साली त्यांचा पहिल्यांदा विधानसभेत पराभव झाला होता. त्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. २०१६ मध्ये ते काँग्रेसमधून विधान परिषद सदस्यदेखील झाले होते. मात्र, २०१९ मध्ये राणे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना राज्यसभेवर खासदार केले.नारायण राणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अफाट ताकदीचे, डॅशिंग अष्टपैलू नेतृत्व आहे. राजकारणातून समाजकारण करण्याची वृत्ती कोकणला दाखविणारे नारायण राणे यांचे व्यक्तीमत्त्व अनेकांसमोर आदर्श आहे.तळकोकणातील पहिलेच मुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्याच्या पाटबंधारे समितीचे सदस्य म्हणून नारायण राणे यांनी १९९१ ते ९३ या काळात काम पाहिले. राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेनेची सत्ता असताना मार्च १९९५ पासून जानेवारी १९९९ पर्यंत कॅबिनेट मंत्री म्हणून आठ खात्यांचा यशस्वी पदभार स्वीकारला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आशीर्वाद दिले आणि राणे कामाला लागले. त्यांच्या रूपाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला म्हणजेच तळकोकणाला प्रथमच मुख्यमंत्रिपदाचा सन्मान मिळाला होता.अभेद्य राजकीय कारकिर्द४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नगरसेवक ते मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कणखर विरोधी पक्षनेते अशी भूमिका बजावताना अभेद्य सह्याद्रीएवढीच राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारी ठरली आहे. कोकण सुपुत्राची महाराष्ट्राच्या राजकारणात तळपत राहिलेली तलवार कोकण विकासाचा मानबिंदू ठरली. शिवसेना ते काँग्रेस आणि आता भाजपा अशा राजकीय प्रवासातही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची छाप अखंड राहिली आहे.
Cabinet Reshuffle: नारायण राणेंना संधी; सिंधुदुर्ग पुन्हा केंद्रीय सत्तास्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 7:52 PM