मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय कॅबिनेटचा विस्तार अलीकडेच दिल्ली इथं पार पडला. या कॅबिनेट विस्तारात मोदींनी अनेक अनपेक्षित राजीनामे घेतले. यात रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचाही समावेश होता. महाराष्ट्रातील ४ जणांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. यात सर्वाधिक चर्चेत असणारं नाव माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणेंचे होते.
भाजपा खासदार नारायण राणेंना(Narayan Rane) केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे लघु, सुक्ष्म उद्योग विभागाचा कारभार सोपवला आहे. नारायण राणे यांना मंत्रिपद देण्यामागं भाजपाची काय रणनीती असावी यावर बरीच चर्चा झाली. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नारायण राणे यांनी जाहीर आभार पत्र लिहून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
वाचा नारायण राणेंनी लिहिलेलं पत्र जसं आहे तसंच...
भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी नड्डा तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मला मिळाली. केंद्रीय मंत्रिपदावर निवड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून, प्रत्येक जिल्ह्यातून, सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यापर्यंत सर्वांनी मला फोन करून व अन्य मार्गाने माझे अभिनंदन केले व मला शुभेच्छा दिल्या.
काही जणांनी देवाजवळ प्रार्थना केल्या, आपल्या या प्रेमाबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. असे मी मानतो. भविष्यातही आपल्याकडून असेच प्रेम, प्रोत्साहन, मार्गदर्शन मिळत राहो. ही नम्र अपेक्षा, आपल्या माझ्यावरच्या प्रेमामुळे भारावून गेल्यामुळे एक वाक्य माझ्या तोंडी आले ते असे. महाराष्ट्रातील सर्व नेते, हितचिंतक, मित्र व कार्यकर्ते या साऱ्यांनी दिलेले प्रेम व सहकार्य यांचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय? असो! भविष्यात प्रत्यक्ष भेटू आणि बोलू असं नारायण राणेंनी पत्रात म्हटलं आहे.
नारायण राणेंना मंत्री का केले?
मुंबई आणि कोकण या दोन्हींमध्ये कनेक्ट असलेला अन् शिवसेनेला भिडणारा नेता म्हणून नारायण राणेंना मंत्री केलं गेलं. नारायण राणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अफलातून व्यक्तिमत्त्व आहे. बरेच नेते एकमेकांसारखे वागतात, बोलतात. राणे त्यात मोडत नाहीत. ते कोणासारखं वागू शकत नाहीत आणि कोणाला त्यांच्यासारखं वागणं परवडूच शकत नाही. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचे निर्णय यातून बरेचदा त्यांचं राजकीय नुकसान झालं पण आजवर त्यांनी जे काही मिळवलं ते याच वेगळ्या शैलीमुळे, हेही खरं!
त्यांनी काँग्रेस सोडली तेव्हा लोक म्हणाले, राणे संपले ! मात्र आता देशाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी दमदार रि-एन्ट्री केली. राणेंना भाजपामध्ये घेताना दहा वेळा विचार झाला होता. ते ‘अनप्रेडिक्टेबल’ आहेत, कधी काय बोलतील याचा नेम नाही इथपासून तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या बोलण्याचा एखाद्या वेळी पक्षालाच त्रास होईल, अशी प्रतिक्रिया होती. पण संघाच्या संमतीनंतर राणेंच्या हातात कमळ दिलं गेलं. त्यासाठी देवेंद्र फडणवीसांना बराच खटाटोप करावा लागला होता.