तामूलपूर मतदारसंघातील निवडणूक रद्द करा -काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 06:50 AM2021-04-03T06:50:45+5:302021-04-03T06:51:18+5:30
आसाममधील तामूलपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली. बोडोलँड पीपल्स फ्रंटचे उमेदवार राम दास बसुमातारी गुरुवारी बंडखोरी करून भाजपमध्ये गेले आहेत.
नवी दिल्ली : आसाममधील तामूलपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने शुक्रवारी निवडणूक आयोगाकडे केली. बोडोलँड पीपल्स फ्रंटचे उमेदवार राम दास बसुमातारी गुरुवारी बंडखोरी करून भाजपमध्ये गेले आहेत.
ज्येष्ठ नेते डॉ. अश्वनी कुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयोगाकडे युक्तिवाद केला की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राहील याची काळजी घेतली पाहिजे. माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्वनी कुमार म्हणाले की, बंडखोरी ही बेकायदा मार्गांनी घडवून आणलेली आहे आणि तीदेखील मतमोजणी सुरू व्हायच्या आधी. निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य, पारदर्शकता आणि एकात्मता अबाधित राहील यासाठी त्याला असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करील याकडे देशाचे लक्ष लागले आहे, असेही अश्वनी कुमार म्हणाले.
वाहनात मशीन कशा?
भाजप उमेदवाराच्या वाहनात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (ईव्हीएम्स) गेल्या कशा याची चौकशी करण्याची मागणीही या शिष्टमंडळाने केली. कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदी यांच्या छायाचित्राचा मुद्दा शिष्टमंडळाने यावेळी उपस्थित केला. त्यावर आयोगाने प्रमाणपत्रावरील छायाचित्र काढून टाकण्याचे आदेश जारी केले.