पुणे: पुणे व बारामती लोकसभा मतदार संघासाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असली तरी अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. परंतु,काही उमेदवारांकडून अर्ज भरण्यासाठी मुहुर्त पाहिला जात असून आत्तापर्यंत पुणे व बारामतीच्या प्रत्येकी दोन उमेदवारांनी पंडित वसंतराव गाडगीळ यांच्याकडून चांगल्या मुहुतार्बाबत विचारणा केली आहे. लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली असून पुणे व बारामती मतदार संघासाठी २८ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. नियमावलीप्रमाणे येत्या ४ एप्रिलपर्यंतच उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे काही उमेदवारांच्या विश्वसनीय निकटवर्तियांकडून तर थेट काही उमेदवारांकडूनच गाडगीळ यांच्याकडून चांगल्या मुहूर्ताची माहिती घेतली जात आहे.पंडीत वसंतराव गाडगीळ म्हणाले,पुणे व बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवू इच्छिणा-या प्रत्येकी २ उमेदवारांनी माझ्याशी संपर्क साधून चांगल्या मुहूर्ताबाबत विचारणा केली.सर्व पक्षातील व कोणत्याही जाती धर्मातील उमेदवार आमच्यासाठी एकसारखे असून ज्यांचा अदृष्य शक्तीवर विश्वास आहे,असेच उमेदवार आमच्याकडून मुहूर्ताची माहिती घेत आहेत.येत्या ४ एप्रिल रोजी दुपारी अमावस्या सुरू होणार आहे. त्यामुळे अमावस्या सुरू होण्यापूर्वी उमेदवारांनी 12.15 पर्यंत अर्ज भरावा,असा सल्ला त्यांना दिला आहे. तसेच सर्वसाधारणपणे रोज सकाळी १० दुपारी १२ वाजेपर्यंतचा काळ आदर्श असतो.या काळात अर्ज भरणे उचित होईल,असे उमेदवारांना व कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
लोकसभेत नशीब आजमावण्याधी आधी उमेदवारांकडून पाहिला जातोय ‘ मुहूर्त ’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 3:23 PM