वसई : पालघर मतदारसंघात युती असूनही शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारादरम्यान वसईत भाजपकडून कमळ चिन्हाचाच प्रचार सुरू असल्याने शिवसेनेत नाराजी आहे. त्यातच प्रतिस्पर्धी बहुजन विकास आघाडीचे चिन्ह असलेल्या रिक्षांवर भाजपचा झेंडा फडकताना दिसू लागल्याने शिवसेना नेत्यांचा तीळपापड झाला आहे.पालघर लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे महायुतीविरोधात बविआच्या महाआघाडीची थेट लढत आहे. हा मतदारसंघ खेचून घेतल्याने भाजपत नाराजी आहे, तर भाजपचा विद्यमान खासदार उमेदवार म्हणून लादल्याने शिवसेनेत रोष आहे. त्याचे पडसाद प्रचारात दिसत आहेत.येथील वसंतनगरीत भाजपने लावलेल्या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी असून, ‘घोटाले से मुक्त इमानदार सरकार, फिर एक बार मोदी सरकार’ अशी घोषणा आहे आणि कमळ निशाणीसमोरील बटण दाबून भाजपला विजयी करण्याचे आवाहनही आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार असूनही निवडणूक चिन्हावरून घोळ मतदारांत संभ्रम आहे. त्यावर सेनेचे नेते नाराज आहेत, पण ते उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. मोदींचे होर्डिंग लावण्यात गैर काय, असा भाजपचा सवाल आहे.शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार रॅलीतही मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते कमळ चिन्ह असलेले आपले झेंडेच सोबत आणत असल्याने धनुष्यबाणाच्या निशाणीचा प्रचार होत नाही, असा शिवसेनेचा आक्षेप आहे. भाजपचे गावित हे आता शिवसेनेचे झाले आहेत, हे लक्षात घ्या, असा टोला त्यावर शिवसेनेच्या नेत्याने लगावला.>रिक्षाला भाजपचा आशीर्वाद?बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे चिन्ह पळवण्यात, ते गोठवण्यात शिवसेना नेत्यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी भाजप नेते उपस्थित होते. हा घटनाक्रम ठावूक असूनही बविआचे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘रिक्षे’वर भाजपचे झेंडे फडकत असल्याने त्याबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. पण प्रत्येक रिक्षा बविआची नाही. एरव्हीही वाहन म्हणून त्यावर पक्षाचे झेंडे लावले जाऊ शकतात, असे सांगत भाजप नेत्यांनी रिक्षेवर झेंडे लावण्याचे समर्थन केले आहे.
उमेदवार शिवसेनेचा; प्रचार मात्र कमळाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 6:14 AM