चंदिगढ – लुधियाना येथील रस्त्यावर बुटांचे सॉक्स आणि रुमाल विकणाऱ्या १० वर्षीय वंश सिंगच्या मदतीसाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी वंश सिंग याच्या घरची हालाखीची परिस्थिती पाहता शुक्रवारी राज्य सरकारकडून त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा आणि तात्काळ २ लाख रुपये अर्थसहाय्य करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. लुधियाना येथे १० वर्षाचा मुलगा कुटुंबाला मदत करण्यासाठी रस्त्यावर सॉक्स विकत होता. या घटनेचा व्हिडीओ कोणीतरी बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर या व्हायरल व्हिडीओची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लुधियानाच्या उपायुक्तांना आदेश दिले की, वंश सिंगला पुन्हा शाळेत पाठवण्याची व्यवस्था करावी.
त्याचसोबत वंशच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलेल. वंश रस्त्यावर सॉक्स विकत असताना एका कार चालकाने त्याला पैसे देऊ केले. तेव्हा सॉक्सच्या ५० रुपये किंमतीपेक्षा जास्त पैसे घेण्यास त्याने नकार दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडे पोहचला. त्यांनी याची दखल घेत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून वंश सिंगच्या कुटुंबाशी संवाद साधला. वंशचा प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान पाहून मुख्यमंत्र्यांनाही कौतुक वाटले. वंशच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर अनेकांनी प्रशंसा केली. वंशचे वडील परमजीत हेदेखील सॉक्स विकतात. तर आई गृहिणी आहे. वंशला ३ बहिणी आणि १ मोठा भाऊ आहे. हैबोवाल परिसरात त्याचे कुटुंब भाड्याच्या घरात वास्तव्य करते.