एक बाकी एकाकी...कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्नी-मुलाचाही पाठिंबा नाही; काँग्रेसची रणनीती यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 08:55 AM2021-10-03T08:55:31+5:302021-10-03T09:02:35+5:30
काँग्रेस आमदारांचा अमरिंदर सिंग यांना पाठिंबा नाही, पत्नी आणि मुलाचाही पक्ष सोडण्यास नकार
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : मुख्यमंत्रीपद गेल्याने पक्ष सोडण्याची धमकी देणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापासून दूर राहण्याचे काँग्रेसच्या ७७पैकी बहुसंख्य आमदारांनी ठरविले असल्याचे दिसत आहे. ते पक्ष सोडण्यास तयार नाहीत. इतकेच काय, पण कॅप्टनच्या पत्नी व पतियाळाच्या काँग्रेस खासदार प्रणित कौर आणि मुलगा रानिंदर सिंग हेही काँग्रेसमधून बाहेर पडायला तयार नाहीत.
काँग्रेसमधून बाहेर पडण्याची घोषणा करणाऱ्या कॅप्टननी आपल्यासोबत काँग्रेसचे बरेच आमदार आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बुधवारी सांगितले. पण ते गुरुवारी चंदीगडला परतले, तेव्हा त्यांच्या स्वागताला हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच आमदार होते. कॅप्टन पंजाब विकास पार्टी स्थापन करतील, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पण आपण कॅप्टनबरोबर गेल्यास फेब्रुवारीतील विधानसभा निवडणुकीत आपण पराभूत होऊ, अशी भीती काँग्रेस आमदारांना वाटत आहे. त्यामुळे ते बाहेर पडायला तयार नाहीत.
सर्वांनाच आहे माहीत
कॅप्टन बाहेर पडण्याची घोषणा करीत असले तरी त्यांच्यामागे आमदार नाहीत, हे सर्वांना लक्षात आले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भाजप व अकाली दल हेही करायला तयार नाहीत.