सिद्धूंना झुकते माप मिळत असल्याने कॅप्टन संतप्त, सोनिया गांधींना लिहिले खरमरीत पत्र, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 23:03 IST2021-07-16T23:02:42+5:302021-07-16T23:03:01+5:30
Amrinder Singh: नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

सिद्धूंना झुकते माप मिळत असल्याने कॅप्टन संतप्त, सोनिया गांधींना लिहिले खरमरीत पत्र, म्हणाले...
नवी दिल्ली - पंजाबमध्येकाँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेली राजकीय वर्चस्वाची लढाई थांबवण्याचे नाव घेत नाही आहे. उलट दिवसागणिक दोन्ही गटांमधील मतभेदांची दरी अधिकच रुंदावताना दिसत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अधिकच आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना एक खरमरीत पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच जर सिद्धू यांना पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले तर पक्षाचे कशाप्रकारे नुकसान होऊ शकते हे अमरिंदर सिंग यांनी या पत्रात मांडले. (Captain Amrinder Singh is angry as Sidhu is getting bent measure, wrote a letter to Sonia Gandhi)
सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, सिद्धू यांच्या कार्यपद्धतीमुळे काँग्रेसला नुकसान होईल. तसेच त्यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडेल. यादरम्यान आता नाराज झालेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांची समजूत घालण्यासाठी हरिश रावत हे उद्या चंदिगड येथे जाणार आहेत. दरम्यान, उद्या दुपारी ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी चर्चा करून हायकमांडची भूमिका त्यांच्यासमोर मांडतील.
नवज्योत सिंग सिद्धू यांना अध्यक्ष बनवण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागल्यापासू कॅप्टन अमरिंदर सिंग हे नाराज आहेत. मात्र सोनिया गांधींसोबत सिद्धूच्या बैठकीनंतर पक्षाने पंजाबसाठीचा निर्णय सध्या पुढे ढकलला आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि हरिश रावत यांच्याशी चर्चा केली होती. तसेच या पेचप्रसंगाबाबत सोनिया गांधी लवकरच निर्णय घेतील, असा दावाही काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत होता.
गेल्या एका आठवडाभरापासून काँग्रेसच्या हायकमांड पंजाबमधील वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना यश येताना दिसत नाही आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याच्या चर्चांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कमालीचे नाराज केले आहे. सिद्धू आणि अमरिंदर सिंग यांनी चंदिगडमध्ये शक्तिप्रदर्शनही केले आहे. त्यातच आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्याने हा वाद एवढ्या लवकर संपणार नाही,अशी चिन्हे दिसू लागली आहेत.