मुंबई - दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. डेलकर यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावरून आज सभागृहात सत्ताधारी पक्षाचे नेते आक्रमक दिसले. तर विधान भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली.
यावेळी मोहन डेलकर यांच्या कुटंबीयांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली. आम्हाला केंद्र सरकारने मदत केली नाही. मात्र आता महाराष्ट्र सरकारव आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा योग्य तपास होईल, अशी अपेक्षा मोहन डेलकर यांच्या पुत्राने व्यक्त केली. तसेच या मोहन डेलकर यांना गेल्या १६ महिन्यांपासून प्रचंड त्रास देण्यात येत होता. या मानसिक त्रासामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला. अपक्ष खासदार असलेले मोहन डेलकर यांनी २२ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.