शीलेश शर्मा नवी दिल्ली : केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी चुकीची पावले उचलत असल्याचा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केला. ते म्हणाले, या पावलांनी अर्थव्यवस्थेत कोणतीही सुधारणा होणार नाही. सरकारने गांभीर्याने असे उपाय शोधावेत ज्यामुळे लोकांच्या खिशांत पैसे येतील व ते स्वेच्छेने तो खर्च करू शकतील.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सोमवारी बैठकीत राज्यांनी विचारलेल्याप्रश्नांना उत्तरे न देता अचानक ती समाप्त झाल्याचे सांगितले. चिदम्बरम यांनी सीतारामण यांच्या या वागण्यावर आश्चर्य व्यक्त करून आरोप केला की, ‘राज्यांची स्वत:ची भूमिका असून, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जायला हवी होती. जर सरकार ते टाळत आहे, तर राज्य सरकारे त्यांना उपलब्ध असलेल्या पर्यायांचा वापर करतील.’सरकारला विचारले प्रश्नचिदम्बरम म्हणाले, राज्यांनी १२ टक्के जीएसटीवाल्या उत्पादनाला आपल्या पैशाने खरेदी का करावे? ते स्वतंत्र आहेत. त्यांंना हवे तेथे ते त्यांचे पैसे खर्च करतील. कर सवलतीच्या नावाने सरकार कर्मचाऱ्यांना ज्या उत्पादनांची गरज नाही, ते विकत घेण्यासाठी भाग पाडत आहे. चिदम्बरम यांनी सरकारला सात प्रश्न विचारले. सरकार अशी बंधने कशी घालू शकते, ज्यात जीएसटीचे बिल असावे, ज्यावर १२ टक्के जीएसटी असावी, जीएसटी नोंदणीकृत दुकान असावे, डिजिटल पेमेंट व्हावे, असे चिदम्बरम म्हणाले.