मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि सरकारी संस्थांचे खासगीकरण यावरुन राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक गंभीर समस्या आहेत, त्याकडे लक्ष द्या, सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती आणि कंगना राणौत या वादातून बाहेर पडा असं त्यांनी म्हटलं आहे.
याबाबत माजिद मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एअरपोर्ट, रेल्वे यांचे खासगीकरण केले जात आहे. केंद्र सरकार बैलगाडी खरेदी करण्याचा प्लॅन करत आहे का? जे लोक सध्या सत्तेत आहेत त्यांना देशाला पुन्हा मागे घेऊन जायचं आहे. पैशाच्या बळावर त्यांना सुट्ट्या एन्जॉय करायच्या आहेत. सुशांत राजपूत, रिया आणि कंगना या सगळ्यातून बाहेर पडा, आसपास आणखी गंभीर समस्या आहेत त्याकडे लक्ष द्या अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारला फटकारलं आहे.
तसेच कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत केलेल्या तुलनेचा माजिद मेमन यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, ज्या कोणाला मुंबई, महाराष्ट्र POK सारखा वाटत असेल, तसेच तालिबान राज्य चाललं आहे असं वाटतंय त्यांनी स्वत:हून अशा धोकादायक ठिकाणाहून लांब गेले पाहिजे. भाजपा अशा लोकांना प्रोत्साहन देत आहे आणि जनतेच्या पैशातून त्यांना सुरक्षा देत आहेत असं सांगत राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी कंगना राणौत आणि भाजपाला फटकारलं आहे.
कंगनाला Y दर्जाची सुरक्षा
मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.
कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते