मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतक-यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असताना केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे होते. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु केंद्राने अजूनही मदत केलेली नाही. दोन महिने झाले तरी अद्याप नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथकही आले नाही. केंद्राची ही भूमिका राज्याला सापत्नभावाची वागणूक देणारी आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या सूडबुद्धीच्या राजकारणाचा समाचार घेताना थोरात पुढे म्हणाले की, कोरोना संकटामुळे महसुल घटला आहे तर दुसरीकडे संकटांची मालिकाच सुरु आहे अशा परिस्थीतीत केंद्र सरकारने राज्याला मदतीचा हात दिला पाहिजे, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. उलट जीएसटी परतावा व राज्याच्या हक्काचे पैसेही दिले जात नाहीत. विरोधी पक्षांच्या सरकारांची कोंडी करण्याचा केंद्रातील भाजपा सरकारचा प्रयत्न आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना थोरात म्हणाले की, ही कारवाई दुर्दैवी आणि आक्षेपार्ह आहे. केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असून भाजपाविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी, सीबीआय, सारख्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा राजकीय कारणांसाठी वापर करुन विरोधकांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कारवाई भाजपाशासित राज्यात झाल्याचे दिसत नाही.
वीजबिलावरुन भाजपाने केलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, वीजबिलात सवलत मिळाली पाहिजे ही काँग्रेसचीही भावना आहे परंतु केंद्र सरकार जनतेची दररोज लूट करत आहे. जागतिक पातळीवर क्रूड ऑईलचे भाव कमी असताना देशात मात्र पेट्रोल डिझेल महाग विकून केंद्र सरकार जनतेची लुटमार करत आहे. विजबिलाविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी या लुटमारीविरोधातही आंदोलन करावे.
महाविकास आघाडीचे सरकार पडेल असे दिवास्वप्न भाजपाचे नेते पाहत आहेत. त्यांनी ही स्वप्ने पहात रहावीत, असा टोला थोरात यांनी रावसाहेब दानवे यांना लगावला. तसेच मी पुन्हा येणार असे म्हणणाऱ्यांचे काय झाले, हे आपण पहातच आहोत. महाराष्ट्रात भाजपाचे कोणतेही ऑपरेशन यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून पुढील चार वर्षाचा कार्यकाळ ही पूर्ण करू असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.