हिमाचल प्रदेशात भाजपासमोर जागा राखण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 03:31 AM2019-01-29T03:31:17+5:302019-01-29T03:36:46+5:30

मतदार नेमका कुणाला देणार कौैल?; घसरलेला आलेख उंचावण्याचे काँग्रेसपुढे अग्निदिव्य

Challenge to Keep BJP Place in Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशात भाजपासमोर जागा राखण्याचे आव्हान

हिमाचल प्रदेशात भाजपासमोर जागा राखण्याचे आव्हान

Next

- कल्पेश पोवळे

पर्यटनासाठी लोकप्रिय व प्रसिद्ध असणाऱ्या राज्यांपैकी एक म्हणजे हिमाचल प्रदेश. सध्या कडाक्याची थंडी व ठिकठिकाणी होणारी बर्फवृष्टी यांमुळे राज्य कुडकुडले आहे. अशा या थंड म्हणून ओळखल्या जाणाºया राज्यांतील राजकीय वातावरण आता तापायला सुरुवात होईल. लोकसभा निवडणुकीतील आपले वर्चस्व आणि प्रतिष्ठा कायम राखण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. दुसरीकडे गेल्या दोन्ही निवडणुकांतील आपला उतरता आलेख उंचावण्याचे अग्निदिव्य काँग्रेससमोर असेल.

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या गेल्या काही निवडणुकांचा निकाल पाहता, येथे सत्ताबदलाची परंपरा आहे. ही परंपरा यावेळीही कायम राहील का, याकडेही सगळ््यांचे लक्ष असेल. राज्यात २००३ मध्ये काँग्रेस तर २००७ मध्ये भाजपाची सत्ता होती. त्यानंतर २०१२ सालच्या निवडणुकीत मतदारांनी सत्ताबदल करीत काँग्रेसला निवडून दिले तर २०१७ च्या निवडणुकीत भाजपाला संधी दिली आहे. लोकसभेचा विचार केल्यास चार मतदारसंघांपैकी २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसने ३ तर भाजपाने १ जागा जिंकली होती. २००९ च्या निवडणुकीत उभय पक्षांनी अनुक्रमे १ आणि ३ जागा जिंकल्या होत्या.

भाजपाने २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला धोबीपछाड देत सर्वच्या सर्व चारही जागा काबीज करून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले. आता आगामी निवडणुकीत काँग्रेसला निवडणूक निकालातील आपला घसरलेला आलेख उंचावण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे जर विधासभेच्या निवडणूक निकालातील बदलाची परंपरा कायम ठेवत मतदार राजाने पुन्हा आपल्याला नाकारून काँग्रेसला संधी देऊ नये यासाठी भाजपाचे नेते प्रयत्न करीत आहेत. या खेपेला आपले वर्चस्व आणि प्रतिष्ठा कायम ठेवण्याचे मोठे आव्हान भाजपापुढे असणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधील मुख्य लढत काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांत झाली. यात काँग्रेसला चारीमुंड्या चीत करताना भाजपाने ५३.३१ टक्के मते मिळवली. काँग्रेसच्या पदरात ४०.७० टक्के मते पडली होती. या निवडणुकीत भाजपाची मते ३.७२ टक्क्यांनी वाढून जिंकलेल्या जागांमध्ये त्यात एका जागेची भर पडली होती. तर निवडणुकीत काँग्रेसच्या मतांमध्ये ४.९१ टक्क्यांनी घट झाली होती.

सन २०१७च्या विधानसभा निवडणुकीत ६८ पैकी ४४ जागा जिंकून भाजपाने या राज्यातील आपला दबदबा पुन्हा दाखवून दिला होता. काँग्रेसने २१, अपक्षांनी २ तर माकपाने एका जागेवर विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाच्या जागा तब्बल १८ ने वाढल्या, तर काँग्रेसच्या जागांमध्ये १५ ने घसरण झाली. दोन्ही पक्षांना मिळालेली मते पाहता भाजपाच्या मतांत १०.३ टक्क्यांची वाढ झाली तर काँग्रेसची मते १.१ टक्क्याने घटली. विधानसभा निवडणुकीचे हे निकाल पाहता आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा कस
लागणार आहे.

धुमल यांची नाराजी हे भाजपासमोरील आव्हान
भाजपा २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत प्रमुख पक्ष म्हणून समोर आला. पण पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख उमेदवार प्रेम कुमार धुमल निवडणुकीत पराभूत झाले. पक्षांतील अनेक नेते या पदासाठी इच्छुक होते. पण भाजपा नेतृत्वाने सर्वांना अंधारात ठेवून जयराम ठाकूर यांना दिल्लीला बोलावून त्यांच्या हाती मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपविली. हे उघड होताच स्थानिक नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. निवडणुकीत धुमल यांच्या जवळ असलेल्या काही दिग्गज नेत्यांचाही पराभव झाला होता. राज्याचा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रेम कुमार धुमल यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी एक गट बनवून केंद्रीय नेतृत्वावर दबावही आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश मिळू शकले नाही. त्यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका या लोकसभा निवडणुकीत भाजपाला भोवण्याची शक्यता आहे.

कॉँग्रेसचा वीरभद्र युगातून निघण्याचा प्रयत्न
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाप्रमाणे काँग्रेसही पक्षांतर्गत अनेक बदल करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपासारखेच प्रदेश पातळीवरील तरुण चेहºयाला नेतृत्व देण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे. त्यासाठी सिलाईचे आमदार हर्षवर्धन चौहान यांचे नाव पुढे आले आहे.
भाजपाने त्यांचे प्रदेश पातळीवरील दिग्गज नेते शांता कुमार आणि धुमल यांच्या वलयातून बाहेर पडून जयराम ठाकूर यांच्यावर जेव्हा नेतृत्वाची जबाबदारी सोपविली, तेव्हा काँग्रेसमध्येही नेतृत्वबदलाचे वारे वाहू लागले.
कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे अखेर काँग्रेसही माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या युगातून निघण्याचा प्रयत्नात आहे. यातूनच काँग्रेसकडून नव्या चेहºयाचा शोध केला व तो हर्षवर्धन चौहान यांच्या नावावर येऊन थांबला. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून याचा फटका पक्षाला बसण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Challenge to Keep BJP Place in Himachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.