पुणे: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामधील उत्तर प्रदेश (UP Election 2022) आणि गोवा (Goa Election 2022) या राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) जोरदार प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. मात्र, यातच भाजपने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
उत्तर प्रदेश आणि गोव्यात दुसऱ्यांदा शिवसेना निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर भाजपकडून निशाणा साधण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला प्रत्येक वेळी उमेदवारांच्या अनामत रक्कम जप्त करण्यासाठी पैसे मिळतात. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि गोव्यात शिवसेना निवडणूक लढवत आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
डिपॉझिट जप्तीसाठी शिवसेनेला दरवेळी पैसे मिळतात
पाच राज्यांच्या निवडणूक कधी घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवतो. त्यात भाजपाची काही भूमिका नाही. संजय राऊत यांना सर्व जगाचे कळते. ते म्हणतात तसे की विरोधी पक्षातील नेत्यांना तलवारीच्या जोरावर धरुन आणलेय की पैशाच्या जोरावर धरुन आणलेय? मग हे तुम्हाला का जमत नाही. शिवसेना उत्तर प्रदेश, गोव्यात निवडणूक लढवते आहे. दरवेळी शिवसेनेला डिपॉझिट घालवण्यासाठी पैसे मिळतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
दरम्यान, गोव्यामध्ये महाविकास आघाडीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही मनापासून प्रयत्न केले पण काँग्रेसच्या मनामध्ये आहे की, ते गोव्यामध्ये स्वबाळावर सत्ता आणू शकतात. त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील त्यामुळे ते मागेपुढे करत आहेत. काँग्रेसने आम्हाला काही जागा दिल्या आहेत पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत पण शिवसेना निवडणुका लढणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.