Chandrakant Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. ''मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सारखं केंद्राला जबाबदार धरणाऱ्या महाविकास आघाडी सरकारची गत अशी झालीय की उद्या आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायची झाली तरी हे दिल्लाला सांगतील की तुम्ही तिथून बघा मग आम्हाला कळवा'', असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचं आरक्षण रद्द होण्याच्या मुद्द्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असून गेली दीड वर्ष हे सरकार झोपलं होतं हे कोर्टानं दिलेल्या निर्णयातून स्पष्ट दिसून येतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
"ओबीसी आरक्षण असो किंवा मग मराठा आरक्षण यावरुन सारखं केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या सरकारमध्ये उद्या आदित्य ठाकरेंसाठी मुलगी पाहायचं झालं तरी हे दिल्लीला सांगतील. तुम्हीच तिथं आधी बघा मग आम्हाला सांगा", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
संजय राऊतांबाबत विचारू नकादेवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी पवारांनी फडणवीसांना महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही, असा सल्ला दिला असेल अशी टीका केली. त्याबाबत विचारण्यात आलं असता चंद्रकांत पाटील यांनी थेट हातच जोडले. "अरे बाबांनो संजय राऊतांबद्दल काही विचारू नका. कालच मी त्यांच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे त्यांना थोबाडीत लगावतील असं विधान केलं होतं. त्यातून अजून ते बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर सारखंसारखं बोलण्याची काही गरज नाही", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.