मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीमधील मंत्री छगन भुजबळ यांची कोट्यवधीची बेहिशोबी मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचा दावा भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे. छगन भुजबळ यांची तब्बल १०० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात एक ट्विट करून हा दावा केला आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या म्हणाले की, इन्कम टॅक्स विभागाने काल एक प्रेसनोट जारी करून ही माहिती दिली आहे. यामध्ये छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. कलकत्ता कंपनीच्या माध्यमातून शेल कंपनीच्या माध्यमातून गुंतवणुकीमधून ही मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. आता याबाबत कोर्टामध्ये बेनामी संपत्ती कायद्याअन्वये फौजदारी दावा दाखल करण्यात आला आहे. त्याची सुनावणी होणार आहे. तसेच यामध्ये सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, असा दावा किरिट सोमय्या यांनी यावेळी केला