- हरीश गुप्तानवी दिल्ली : छत्तीसगडची जनता ११ खासदार निवडून देते. अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारुण पराभवानंतर भाजपने विद्यमान १० खासदारांचे तिकीट कापले आहे. भाजपला सर्व जागा टिकवायच्या आहेत, तर विधानसभा विजयाने काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.काँग्रेसनेही ११ नवे चेहरे दिले आहेत. त्यामुळे नव्या रूपातील भाजप व काँग्रेसची लढाई पाहायला मिळेल. भाजपने रमणसिंग यांच्या खासदारपुत्राला संधी दिलेली नाही. रमेश बैस यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेसही मोठ्या तयारीत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि काँग्रेसचे सरचिटणीस पी. एल. पुनीया यांनी पक्षाचा तोंडावळा बदलून टाकला आहे. लोकसभेला सामोरे जाताना भाजपपुढे खूप आव्हाने आहेत. अजित जोगी यांच्या पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. नव्या दमाच्या काँग्रेसचा सामना करीत असताना भाजपला नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.काँग्रेसच्या बघेल सरकारने शेतकऱ्यांकडून ८० लाख टन तांदळाची खरेदी केली आहे. या तांदळाचे काय करायचे, हे सरकारला ठरवता आले नाही. परंतु यामुळे काँग्रेसला विजय मिळाला होता. बसपचे ११ उमेदवार आहेत. परंतु बसपचे मतदान २ ते ३ टक्केच आहे. राज्यातील नक्षलवाद्यांनी आदिवासींना खुलेपणाने मतदान करण्याची मोकळीक दिली आहे, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. यामुळेच बस्तरसारख्या परिसरात सर्वाधिक ६६ टक्के मतदान झाले होते.खरेतर छत्तीसगड हे असे एकमेव राज्य आहे जिथे पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांची निवड आणि प्रचाराची रणनीती ठरवण्याचे अधिकार पूर्णपणे राज्यातील नेत्यांना दिले आहेत. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या प्रचंड बहुमतामुळे हा बदल झालेला दिसतो. या निवडणुकीत पक्षाने एकूण ४३ टक्के मते मिळविली होती. जवळपास दोन दशकांनी पक्षाला राज्यात असे यश संपादन करता आले आहे.
छत्तीसगड: भाजप आणि काँग्रेसचेही नवे चेहरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 3:38 AM