- साहेबराव नरसाळेसलग १५ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपाला नुकत्याच झालेल्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकांत अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले. या पराभवाची जबाबदारी वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांवर ढकलल्याने भाजपात गटबाजी उफाळली आहे़ हे वादळ शमले नसतानाच पराभूत नेत्यांवरच भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविल्याने आता ही ‘भारतीय पराभूत पार्टी’ झाली, अशी टीका नाराज करु लागले आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ११ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपाने ठेवले आहे़ या मतदारसंघांची विभागणी रायपूर, बस्तर, बिलासपूर या तीन विभागांमध्ये केली जाते. त्यासाठी भाजपाने प्रभारी नियुक्त केले आहेत़ रायपूर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री राजेश मुनोत, बस्तर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री केदारनाथ कश्यप, बिलासपूर विभागाचे प्रभारी म्हणून माजी मंत्री अमर अग्रवाल यांची नियुक्ती केली आहे़ हे तीनही प्रभारी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत.भाजपाने प्रदेशाध्यक्ष धरमलाल कौशिक यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्याने तिथे नाराजी आहे़ कौशिक यांची एकतर्फी निवड केल्याने काही आमदार नाराज आहेत. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवनारायण द्विवेदी यांनी राजीनामा दिला असून, ते काँगे्रसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत.काँगे्रसमधून बाहेर पडून जनता काँगे्रस पक्ष स्थापन केलेल्या अजित जोगी यांनाही बंडखोरांनी ग्रासले आहे़ जनता काँगे्रसचे वरिष्ठ नेते अब्दुल हमीद हयात व बृजेश साहू यांची बंडखोरीमुळे हकालपट्टी करण्यात आली़ याच पक्षाचे सियाराम कौशिक, चंद्रभान बारमते, चैतराम साहू, संतोष कौशिक हे नेते काँगे्रसच्या संपर्कात आहेत. ते २८ जानेवारी रोजी काँगे्रसमध्ये प्रवेश करतील, या शक्यतेला काँगे्रसचे प्रभारी पी़ एल़ पुनिया यांनी दुजोरा दिला आहे.लोकसभेच्या तयारीसाठी काँगे्रसच्या बैठका सुरु आहेत. पण विधानसभेतील विजयामुळे काँगे्रसमध्येही गटबाजी आहे़ ‘प्रत्येक पक्षात बंडखोरी असतेच’, असे सांगत आरोग्यमंत्री टी़ एस़ सिंहदेव यांनी ही समस्या आमच्याकडे असल्याचे मान्य केले. मात्र काँग्रेसमधील कोणीही नेता बंडखोरी करणार नाही, असा दावा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला.जनता काँग्रेस व बसपाची युतीलोकसभेसाठी अजित जोगी यांची जनता काँगे्रस व बसपाची युती आहे़ जनता काँगे्रसला ७ व बसपाला ४ जागा असा फॉर्म्युला ठरला आहे़ याची माहिती जनता काँगे्रसने दिली़ मात्र, बसपाने त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही़एकाच जागेच्या विजयाचा इतिहास पुसणार?मध्यप्रदेशचे विभाजन करून नोव्हेंबर २००० मध्ये छत्तीसगडची निर्मिती करण्यात आली़ त्यानंतर काँगे्रसचे अजित जोगी हे पहिले मुख्यमंत्री झाले़ पण २००३ सालच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत भाजपने ५० जागा जिंकून काँगे्रसला धूळ चारली़मुख्यमंत्री झालेल्या रमण सिंह यांनी छत्तीसगडमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले़ महासमुंदमधून २००४ च्या लोकसभा निवडणुकीत महासमुंद अजित जोगी हे एकमेव काँगे्रस उमेदवार निवडून आले, तर २००९ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला पुन्हा एकाच जागेवर रोखले़दुर्गमधून २०१४ साली दुर्ग काँगे्रसचे ताम्रध्वज साहू हे एकटेच विजयी झाले़ म्हणजेच तीन लोकसभा निवडणुकांत काँगे्रस एका जागेवरून पुढे सरकली नाही. या एका जागेचा इतिहास पुसण्याचे आव्हान काँगे्रसपुढे आहे़
छत्तीसगडमध्ये गटबाजी, नाराजीच्या लाटेत फसली भाजपा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 3:49 AM