Corona Vaccine: लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवला अन् मुख्यमंत्र्यांचा छापला; आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 11:51 AM2021-05-22T11:51:17+5:302021-05-22T11:53:11+5:30
छत्तीसगड सरकारने देशभरात लसीकरणासाठी नोंदवण्यात येत असलेल्या कोविन अँपऐवजी १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी स्वत:चा CGTEEKA अँप लॉन्च केला आहे.
रायपूर – छत्तीसगड सरकारने कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा(PM Narendra Modi) फोटो हटवून मुख्यमंत्र्याचा फोटो लावण्यास सुरूवात केली आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना देण्यात येणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटा लावण्यात आला आहे. तर आतापर्यंत वाटप झालेल्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता.
छत्तीसगड सरकारने देशभरात लसीकरणासाठी नोंदवण्यात येत असलेल्या कोविन अँपऐवजी १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी स्वत:चा CGTEEKA अँप लॉन्च केला आहे. ज्यावर युवकांना नाव नोंदवून लस घेता येऊ शकते. या अँपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर युवकांना लस दिली जात आहे. आणि त्यांना देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो लावण्यात आलेला आहे.
भाजपाने यावर आक्षेप घेत म्हटलंय की, आपत्कालीन परिस्थितीत काँग्रेस प्रचार करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो असलेल्या प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येत आहे असा आरोप त्यांनी केला. त्यावर छत्तीसगड सरकारचे आरोग्य मंत्री टी.एस सिंहदेव म्हणाले की, यात चुकीचं काय आहे? केंद्र सरकारकडून जी लस मिळत आहे ज्यांना ती लस दिली जातेय अशांना पंतप्रधान मोदींचा फोटो असलेलं प्रमाणपत्र देण्यात येत आहे. परंतु जी लस छत्तीसगड सरकारने १८ ते ४४ वयोगटातील जी लस खरेदी केली आहे. ती घेणाऱ्या लोकांना जर मुख्यमंत्र्यांचा फोटो असलेले प्रमाणपत्र दिले तर त्यात बिघडलं काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान मर्यादित साठा असूनही छत्तीसगड १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत ७ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. ज्या राज्यात लसीकरण वेगाने होत आहे त्यात छत्तीसगडचा समावेश आहे. अशावेळी प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो असण्यावर घेतलेला आक्षेप विनाकारण राजकारण आहे असा टोलाही आरोग्यमंत्री टी.एस सिंहदेव यांनी भाजपाला लगावला आहे.
देशात वाढतायेत मृत्यूचे आकडे
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ४ हजार २०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताचा कोरोना मृत्यूदर १.११ वरून १.१२ टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्रात ७३८ रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक ५४८, तामिळनाडू ३९७ तसेच दिल्लीत २५२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.