मुंबई - गेल्या दोन तीन दिवसांसापून सातत्याने कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणसह कोकणातील विविध भागात अभूतपूर्व अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. (Chiplun Flood Update)त्या पार्श्वभूमीवर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच, या संकटाच्या परिस्थितीत भाजपा राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करेल, असं आश्वासन दिलं आहे.
याबाबत माहिती देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चिपळूणसह कोकणातील अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि माझ इतरही सहकारी या भागात दौरे करीत आहेत. पिण्याचे पाणी आणि तयार अन्नाची पाकिटे ही आताच्या घडीला तातडीची गरज आहे.
चिपळूण आणि कोकणातील इतर भागात उदभवलेल्या या पूरस्थितीबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. पूरग्रस्त भागात पिण्याचे पाणी आणि अन्नाची पाकिटे उपलब्ध करून देण्यााबाबत तातडीने लक्ष देण्याची विनंती मी त्यांना केली आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकार ते तत्काळ उपलब्ध करून देईल, असे सांगितले आहे. दरम्यान, या संकटाच्या प्रसंगी सरकारला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असेही मी त्यांना सांगितले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात ज्यांचे प्राण गेले त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सारे या कुटुंबीयांसोबत आहोत. जखमींना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना करतो, अशी भावनाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.