बिहारच्याराजकारणात सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे नेते (LJP) आणि खासदार चिराग पासवान यांना आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आलं आहे. चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांनी चिराग यांना पक्षातून बाहेरचा रस्त दाखवला आहे. लोकजनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांना डच्चू देत पशुपती पारस यांना पाठिंबा देत नेतेपदी निवड केली होती.
दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यपदावरुन हटविण्यात आल्यानं चिडलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोरी करणाऱ्या पाचही खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर चिराग पासवान यांना आता राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आल्यानंतर त्यांना विरोधी पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि लालू प्रसादर यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाकडून चिराग पासवान यांना पक्षात सामील करुन घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.
एनडीएची साथ सोडून तुम्ही आमच्यासोबत या आणि विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करा, अशी थेट ऑफर राजदकडून चिराग पासवान यांना देण्यात आली आहे. आता चिराग पासवान नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
'राजद'च्या आमदारानं सांगितलं राजकीय 'गणित' राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई बिरेंद्र यांनी चिराग पासवान यांच्यासमोर एक अनोखी ऑफर ठेवली आहे. चिराग पासवान यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत यावं आणि त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा द्यावा. सध्याची परिस्थिती दोन युवा नेत्यांनी एकत्र येण्याची आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करुन चिराग पासवान यांनी केंद्रात राहून दिल्लीतलं राजकारण सांभाळावं, अशी ऑफर राजद आमदार भाई बिरेंद्र यांनी दिली आहे.
पशूपती पारस यांच्या बंडखोरीनं चिराग पडले एकटेलोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत. बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड करताच पारस यांनी ‘मी पक्ष फोडलेला नाही, तर वाचवला आहे’, अशी प्रतिक्रिया पत्रकारांकडे व्यक्त केली होती. पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत. या बंडानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली.