पाटणा - स्वपक्षीय आणि कुटुंबीयांनीच दगाबाजी करून पक्षावर कब्जा केल्याने दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना जबरदस्त धक्का बसला आहे. दरम्यान, काका पशुपती पारस (Pashupati Paras) यांनी केलेली बंडखोरी आणि इतर नेत्यांकडून त्याला मिळालेली साथ यावर चिराग पासवान (Chirag Paswan ) यांनी मौन सोडत प्रथमच भाष्य केलं आहे. या घटनाक्रमावर बोलताना चिराग पासनाव यांनी भावूक होत पक्ष आणि कुटुंबाला एकजूट ठेवण्यात आपण अपयशी ठरलो, असे म्हटले आहे. (Chirag Paswan spoke for the first time on the developments in the Lok Janshakti party)
चिराग पासवान यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काका पशुपती पारस यांना लिहिलेली काही पत्रे शेअर केली आहेत. दरम्यान, या ट्विटमध्ये चिराग पासवान म्हणाले की, माझ्या वडलांनी स्थापन केलेला हा पक्ष आणि माझ्या कुटुंबाला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न मी केला. मात्र त्यात मी अयशस्वी ठरलो. पक्ष हा मातेसमान असतो. त्यामुळे आईची फसवणूक करता कामा नये. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मी आभार मानतो.