पुणे – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच पंढरपूर येथे पोटनिवडणूक असल्याने याठिकाणी सगळेच राज्यकर्ते प्रचाराला गेले होते. सत्ताधारी असो वा विरोधक दोन्ही पक्षांनी याठिकाणी हजारोंच्या संख्येने गर्दी करून प्रचार सभा घेतल्या. मेळावे पार पाडले त्यामुळे आता निवडणुकीनंतर पंढरपूरातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे.
यातच पंढरपूरातील कोरोना रुग्णवाढीला नागरिकच जबाबदार आहेत असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करून सगळं खापर लोकांच्या वर फोडलं आहे. पुण्यात अजित पवार पत्रकारांना म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाने पंढरपूरात निवडणूक लावली म्हणून प्रचाराला गेलो, राज्य सरकारच्या हातात ज्या निवडणुका होत्या त्या आम्ही पुढे ढकलल्या. पण पश्चिम बंगाल,केरळ, आसाम, तामिळनाडू इथंही निवडणूक लावली त्यामुळे तिकडे जाऊन सगळेजण प्रचार करतच होते ना...कुंभ मेळ्यात लाखो लोकांनी स्नान केले होते. याला जबाबदार नागरिक आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक लावली त्यांना जबाबदार कसं धरणार...जी काही नियमावली ठरवली आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून सभा आयोजित करावी असं आम्ही सांगितलं परंतु काहीजण मास्क लावत नव्हते, रुमाल लावायचे त्यांना आम्ही काय बोलणार? असं सांगत त्यांनी हात वर केले आहेत.
पंढरपूरात कोरोनाची स्थिती काय?
मंगळवेढा तालुक्यात सध्या कोरोनाचे १६७१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. केवळ एप्रिल महिन्यातील आकडेवारी असल्याने आणखी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता आहे. दररोज ४०० ते ५०० नागरिकांची टेस्टिंग केली जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील २५ गावात कोरोनाचा कहर सुरू असून गावच्या गावं बाधित होत असल्याचं दिसून येत आहे. पंढरपूरात दिवसाला ८ ते १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू होतोय. मागील ७ दिवसांत १ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
अजितदादांच्या सभेला नियमावलीचा फज्जा
कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे या कार्यक्रमासाठी परवानगी घेणारे राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात भादंवि १८८ अन्वये गुन्हा नोंदवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत गर्दी केल्याने तीन गुन्हे नोंद आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या सभेला गर्दी होतच असते. परंतु सध्याच्या कोरोना काळात मनात आणले असते तर अजितदादा हे गर्दी टाळू शकले असते अशी टीका सोशल मीडियातून अजित पवारांवर करण्यात आली होती.