नवी दिल्ली - दिल्लीमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. बुधवारी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. भाजपाचे काही कार्यकर्ते आपल्या एका नेत्याचे स्वागत करण्यासाठी गाझीपूर सीमेवर पोहोचले. ते येताच या ठिकाणी मोठा राडा सुरू झाला. यावरून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी (Rakesh Tikait) इशारा दिला आहे. भाजपाचे नेते कार्यकर्ते इथे आले तर एकेकाचे बक्कल काढले जाईल. हे शेतकऱ्यांच्या संयुक्त मोर्चाचे व्यासपीठ आहे. यावर कोणीही कब्जा करण्याचा प्रयत्न करू नये, असं टिकैत यांनी म्हटलं आहे.
राकेश टिकैत यांनी रस्ता सर्वांचा आहे. पण शेतकऱ्यांच्या संयुक्त मोर्चाच्या व्यासपीठावर कोणीही कब्जा करू शकत नाही. संपूर्ण उत्तर प्रदेशात त्यांना कुठेही फिरू दिले जाणार नाही. झेंडा लावून व्यासपीठावर कब्जा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर 'उपचार' केला जाईल, असा इशारा दिला आहे. व्यासपीठावर कब्जा करून कुणाच्याही स्वागताला कशी काय परवानगी दिली जाऊ शकते. हे सर्व पोलिसांच्या उपस्थित घडलं आहे. व्यासपीठावर कब्जा करून आपल्या नेत्यांचे स्वागत करून दाखवण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. व्यासपीठ हवे आहे तर मग आंदोलनात सहभागी का होत नाही? असा सवाल देखील टिकैत यांनी केला आहे.
कुणी आपला झेंडा घेऊन येत असले तर त्याला काळे झेंडे ही दाखवले जाऊ शकत नाहीत का?. कोणत्याही गाडीची तोडफोड करण्यात आलेली नाही. हे काम त्यांनी केले आहे. गेल्या 7 महिन्यांत इथून हजारो गाड्या गेल्या. कुठल्याही गाडीवर दगडफेक झालेली नाही, असा दावा टिकैत यांनी केला. या घटनेत काही जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच काही गाड्यांचंही नुकसान झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. "स्वतंत्र भारत देशात कधी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे लागेल, याचा विचारही केला नव्हता. शेतकरी आणि सरकारमधील चर्चा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी पत्रही पाठवले होते. मात्र, काही झाले, तरी कायदा मागे घेतला जाणार नाही. अन्य मुद्द्यांसाठी चर्चेला यावे, असे उत्तर मिळाले."
केंद्रीय कृषी कायद्यावर ठोस उपाय निघेल, असे आताच्या घडीला तरी वाटत नाही, असे राकेश टिकैत यांनी याआधी बोलताना नमूद केलं होतं. दरम्यान, गतवर्षीच्या 26 नोव्हेंबर रोजी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महिन्याच्या 26 तारखेला विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे आंदोलनस्थळी गर्दी कमी आहे. मात्र, आगामी काळात शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी जमतील. तसेच या प्रकरणी ठोस निर्णय, तोडगा निघत नाही, तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाही, याचा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी केला.