सदानंद नाईक -
उल्हासनगर- कलानी महलमध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर पंचम कलानी (Pancham Kalani) यांच्यासह समर्थकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कलानी कुटुंबाची पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी झाली. शहराध्यक्षा सोनिया धामी यांची मंगळवारी प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्यानंतर, शहरजिल्हाध्यक्ष पदी पंचम कलानी यांची बुधवारी नियुक्ती केली. त्यापूर्वी पंचम कलानी यांनी महापालिका आयुक्तांकडे भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. (Kalani Family Joins NCP)
उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी पक्षाच्या परिवार संवाद कार्यक्रमातून मिळत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, केबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह आनंद परांजपे यांनी शनिवारी संवाद कार्यक्रमानंतर कलानी महलमध्ये मुक्काम ठोकले. मध्यरात्री बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर, कलानी कुटुंब पुन्हा राष्ट्रवादीमय होईल. हे स्पष्ट झाले. पक्षाच्या शहाराध्यक्षा सोनिया धामी व गटनेते भारत गंगोत्री यांचा विरोध डावलून कलानी कुटुंबाकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व दिले. शहाराध्यक्ष सोनिया धामी यांची मंगळवारी रात्री पक्ष्याच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली. तर बुधवारी सकाळी पंचम कलानी यांनी सकाळी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दुपारी समर्थकांसह राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतल्यावर त्यांची शहरजिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
पंचम कलानी यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने, भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी महापालिका निवडणूक तोंडावर आली असतानाच, ओमी कलानी व समर्थकांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत ओमी टीमची स्थापना केली होती. तसेच भाजप आघाडीसोबत जाऊन टीम कलानी समर्थकांनी भाजप चिन्हावर निवडणूक लढविली. पंचम कलानी भाजपच्या महापौर झाल्या होत्या. दरम्यान विधानसभेला ज्योती कलानी यांना शब्द देऊनही आमदार पदाची उमेदवारी भाजपने न दिल्याने, भाजप व कलानी कुटुंब आमने-सामने आले. ज्योती कलानी यांच्या मदतीला पुन्हा राष्ट्रवादी धावून आली, त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. मात्र कमी मतांनी त्यांचा पराभव होऊन भाजपचे कुमार आयलानी आमदार झाले. दरम्यान महापौर निवडणुकीत ओमी कलानी यांच्या समर्थक नगरसेवकांनी भाजपच्या उमेदवाराऐवजी शिवसेनेच्या लिलाबाई अशान याना मतदान करून महापौर पदी निवडून आणले.
शहर झाले कलानी व राष्ट्रवादीमय - माजी आमदार पप्पु कलानी यांची पेरॉलवर सुटका झाल्यानंतर, त्यांनी नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेवून, गेल्या काही दिवसात शहर कलानीमय केले. याचाच फायदा कलानी कुटुंबाला होऊन त्यांची राष्ट्रवादीत घरवापसी झाल्याने शहर कलानी व राष्ट्रवादीमय झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी प्रवेशाला गालबोट?राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याच्या यादीत पीआरपी पक्षाचे नगरसेवक प्रमोद टाले, साई पक्षाचे गजानन शेळके, रिपाईचे नगरसेवक वाघे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची यादी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतल्याच्या बातमीचे प्रमोद टाळे, रिपाईचे नगरसेवक वाघे, साई पक्षाचे गजानन शेळके यादी खंडन करून आम्ही आमच्या पक्षात असल्याची प्रतिक्रिया दिली.