नवी दिल्ली:दिल्लीत आता ऑक्सिजन सिलेंडरच्या पुरवठ्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या ऑक्सिजन ऑडिट कमिटीने मे महिन्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकदरम्यान दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा आणि वापर यामध्ये मोठी तफावत असल्याचा दावा केला आहे. तर, ही रिपोर्ट भाजपच्या मुख्यालयातून तयार करण्यात आल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे. या एकूणच प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य करत दोन कोटी लोकांच्या जीवासाठी लढलो, हाच माझा गुन्हा असल्याचे म्हटले आहे. (cm arvind kejriwal slams bjp over oxygen shortage crisis issue in delhi)
दिल्लीवासीयांसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गरजेपेक्षा चारपट ऑक्सिजन मागून घेतला. दिल्लीला पुरवठा करण्यात आलेला ऑक्सिजन आणि प्रत्यक्ष वापर यांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या कमिटीने तयार केलेल्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
“खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”: भाजप
दोन कोटी लोकांच्या जीवासाठी लढलो, हाच माझा गुन्हा
अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी दोन कोटी लोकांच्या जीवासाठी लढलो, हा माझा गुन्हा आहे. जेव्हा तुम्ही निवडणुकीसाठीच्या प्रचारसभा करत होता त्यावेळी मी रात्री जागून ऑक्सिजनची व्यवस्था करत होतो. नागरिकांना ऑक्सिजन मिळण्यासाठी भांडलो, हात पसरले, विनंत्याही केल्या. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपल्या प्रिय व्यक्तींना गमावावे लागले आहे. त्यांना खोटारडे म्हणू नका, त्यांना फार वाईट वाटत आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून हे सांगण्यात आले की हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या ऑडिट टीमचा आहे. परंतु, आम आदमी पक्षाने हा अहवाल दिशाभूल करणारा आणि चुकीचा असल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे सांगताना मनिष सिसोदिया यांनी अहवालात नमूद करण्यात आलेली माहिती फेटाळून लावत भाजपने आपल्या पक्षाच्या मुख्यालयात हा अहवाल तयार केल्याचा आरोप केला आहे.