मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या रामप्रहरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोडत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्रपदाची शपथही घेतली होती. मात्र, शरद पवार यांच्या स्ट्राईकमुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परतले होते. याला वर्ष होत नाही तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो देखील राऊत यांनी रिलीज केला आहे.
महाविकास आघाडीला वर्ष पूर्ण होत आहे. ही मुलाखत उद्या प्रसिद्ध होणार आहे. या अभिनंदन मुलाखतीचा प्रोमो पोस्ट करताना राऊत यांनी उद्या धमाका असे कॅप्शन दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे देखील काही प्रश्नांवर बिचकल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. 44 सेकंदांचा हा प्रोमो आहे.
मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिले आहे. यावर त्यांनी ''ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन'', असा इशारा दिला आहे.
हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका, कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले त्या आडवे येणाऱ्यांना आडवं करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.
प्रोमोमधील काही प्रश्नकसं वाटतं आपल्याला?...मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. महाराष्ट्र आत्मनिर्भर कधी होणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? तुमच्या जिवनात वर्षभरात काय बदल झाले? असे प्रश्न या प्रोमोमध्ये दाखविण्यात आले आहेत.
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्षपूर्तीचा कामांचा अहवाल लोकांपुढे लवकरच ठेवला जाईल असे सांगितले होते. तो अहवाल याच मुलाखतीतून मुख्यमंत्री मांडणार तर नाहीत ना, अशी उत्सुकताही अनेकांना लागली आहे. दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजपाने टीका केली होती. तसेच नुकत्याच झालेल्या पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील भाजपा नेत्यांची तक्रार केली होती. महाविकास आघाडीविरोधात भाजपा नेत्यांच्या चाललेल्या कुरघोड्या, त्यांना हात धुन्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा आदी या मुलाखतीचा मूळ भाग असण्याची शक्यता आहे.