नवी दिल्ली - कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असली, तरी तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकारांनी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. तसेच लसीकरणावरही अधिकाधिक भर दिला जात आहे. यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, त्यानंतरच मन की बात करा, असं म्हटलं आहे. याच दरम्यान मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "राहुल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य धोक्यात टाकताहेत" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
"राहुल गांधी (Rahul Gandhi) हे गैरसमज आणि अफवा पसरवण्याचं करत असून कोरोना लसीकरणाबाबत (Vaccination) ते करत असलेली विधानं हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे" अशी टीका शिवराज सिंग चौहान यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण पुरवत आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी अफवा पसरवून देशातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असं देखील मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सातत्याने अनेकविध मुद्द्यांवरून जोरदार टीका करताना दिसत आहेत.
कोरोनाची दुसरी लाट, कोरोना लसीकरण, महागाई, जीएसटी, इंधनदरवाढ यांसारख्या विविध विषयांवरून राहुल गांधी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम आणि कोरोना लसीकरणावरून राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. फक्त प्रत्येक देशवासीयांपर्यंत लस पोहोचवा, मग हवे असल्यास मन की बात पण सांगा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यासह लसीकरणाबाबतचे तथ्य आणि सत्य दर्शवणारा एक ग्राफही शेअर केला आहे. याशिवाय #VaccinateIndia हा हॅशटॅगही दिला आहे.
पंतप्रधान मोदींकडून आढावा बैठक
देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला करोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. लसीची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर केंद्र सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. सरकारला यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे, असे यावेळी सांगितले गेल्याचे म्हटले जात आहे.