उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अखेर मंगळवारी राजीनामा दिला. त्रिवेंद्र सिंह रावत यांना हटवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिल्लीत येऊन अनेक भाजप नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या. मात्र, अखेरीस त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपुर्द केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची नियुक्त होत नाही तोवर त्यांच्याकडेच कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजीनाम्यानंतर रावत यांनी माध्यमांशी संवाद साधला. "भाजपमध्ये जे कोणते निर्णय घेतले जातात ते सामूहिक विचारानंतरच घेतले जातात. उद्या मुख्यालयात १० वाजता एक बैठक आहे. त्या ठिकाणी सर्व आमदार उपस्थित असतील," असं ते म्हणाले. यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का द्यावा लागला याबाबत विचारणा करण्यात आली. यावर बोलताना त्यांनी याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला दिल्लीला जावं लागलं. तुम्हाला हा प्रश्न पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला विचारावा लागेल असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं.''भाजपने मला मुख्यमंत्रीपदाची सुवर्ण संधी दिली. गेली चार वर्षे उत्तराखंड राज्याची धुरा सांभाळली. पक्ष माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवेल, असा विचारही केला नव्हता. मात्र, यानंतर दुसऱ्या व्यक्तींवर मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे'', असं रावत यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
या नावांची चर्चात्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर भाजप धन सिंह रावत किंवा सतपाल महाराज यांच्या नावाचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच आमदारांमध्ये याबाबत एकमत निर्माण करण्याचे प्रयत्नही केले जात आहे. राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी यांच्या नावाचीदेखील चर्चा सुरू आहे.