नवी दिल्ली: मराठा आरक्षणाच्या संदर्भात केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची दिल्लीत पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे हेदेखील उपस्थित राहणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायद्याला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असा निर्णय दिला आहे; पण केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून ‘ईडब्ल्यूएस’ला ही मर्यादा ओलांडता येईल, अशी तरतूद केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचं शिष्टमंडळ मोदींची भेट घेणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा होईल. याशिवाय तौक्ते चक्रीवादळ, कोरोना परिस्थितीबद्दलदेखील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासाठी आज उद्धव ठाकरे माेदींना भेटणार; अजित पवार, अशोक चव्हाण उपस्थित राहणारमुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख या नात्यानं मोदींची स्वतंत्र भेट घेण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि मोदींची भेट व्हावी यासाठी शिवसेनेचे नेते प्रयत्नशील असल्याची माहिती एबीपी माझानं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. मात्र अद्याप तरी याला कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मोदी आणि ठाकरे यांच्यात १० मिनिटांची वेगळी भेट व्हावी असा शिवसेना नेत्यांचा प्रयत्न आहे. या भेटीत राजकीय चर्चा होऊ शकते.मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दिल्लीला पोहोचले. त्यावेळी शिवसेनेचे काही नेते त्यांच्या स्वागताला विमानतळावर गेले. यामध्ये नांदेडचे खासदार हेमंत पाटील यांचा समावेश आहे. 'मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची स्वतंत्र भेट होईल का याबद्दल मला कल्पना नाही. तशी माहिती माझ्याजवळ नाही. मुख्यमंत्री मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी दिल्लीत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात मराठा आरक्षणाबद्दल चर्चा होईल,' असं पाटील यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री ठाकरे 'वेगळ्या नात्यानं'देखील पंतप्रधान मोदींची भेट घेणार?; दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 10:29 AM