मुंबई – राज्यातील प्रश्नांना घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका अलीकडेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली होती, राऊतांचा निशाणा भाजपा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर होता, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटत नाहीत म्हणून लोक राज्यपालांकडे जातात असा टोला भाजपा नेत्यांनी लगावला होता, मागील काही महिने राज्यातील समस्यांबाबत अनेक नेते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत असल्याने राजभवन चर्चेत आलं आहे.
मात्र शुक्रवारी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री दर्जा असणारे किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली, किशोर तिवारी हे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत, विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय द्यावा, खुद्द राज्यपालांनी या भागाचा दौरा करावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी निवेदनद्वारे केली. इतकचं नाही तर राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींची मदत घोषित केली आहे, ती पुरेशी नाही अशी तक्रारही किशोर तिवारींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे केली.
यावेळी किशोरी तिवारी यांनी सांगितले की, विदर्भ आणि मराठवाडा यांचा अनुशेष दूर करावा अशी मागणी राज्यपालांना केली, अतिवृष्टीमुळे पीडित शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात आलेल्या १० हजार कोटींच्या मदतीत विदर्भाला खूप कमी मदत मिळणार असल्याचं राज्यपालांना सांगितले, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुंबईत आलो होतो, पण मुख्यमंत्री भेटले नाहीत, त्यामुळे राज्यपालांकडे जाऊन भेट घेतली, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
मागील ४ दिवसांपासून किशोर तिवारी मुंबईत आहेत, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांना भेट झाली नाही अखेर तिवारी यांना राजभवनाचे दार ठोठावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार आणि आमदारांसाठी नॉट रिचेबल असतात, अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भेट झाली नाही. अमर उजालाच्या वृत्तानुसार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ५० वेळा फोन केल्याचा दावा केला. पण मुख्यमंत्र्यांकडून काहीही उत्तर आलं नाही. त्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेत आपल्या मागणीसाठी राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी केली.
काय म्हणाले होते संजय राऊत?
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारलं होतं.