अजितदादांनी दिलेला शब्द पाळला नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी ३ जणांची यादी पाठवली; राज्यपाल घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 07:14 AM2021-08-01T07:14:09+5:302021-08-01T07:19:00+5:30

MPSC रिक्त सदस्यांसाठी राज्यपालांकडे आता आणखी एक यादी, ३१ जुलैपूर्वी नियुक्त करण्याचे दिले होते उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन

CM Uddhav Thackeray Sent 3 name list for MPSC Member Post to Governor Bhagat Singh Koshyari | अजितदादांनी दिलेला शब्द पाळला नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी ३ जणांची यादी पाठवली; राज्यपाल घेणार निर्णय

अजितदादांनी दिलेला शब्द पाळला नाही मात्र मुख्यमंत्र्यांनी ३ जणांची यादी पाठवली; राज्यपाल घेणार निर्णय

Next
ठळक मुद्देमुलाखतीच्या विलंबामुळे आलेल्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याचे पडसाद विधानसभेत उमटले होतेएमपीएससीमार्फत भरतीची सक्षम व गतिमान व्यवस्था निर्माण केली जाईलतीन पदांसाठी तीन नावे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली आहेत

यदु जोशी

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची सर्व रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरण्यात येतील, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५ जुलै रोजी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र, तीन सदस्यांची नावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे आलेल्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले होते. त्या वेळी एमपीएससीमार्फत भरतीची सक्षम व गतिमान व्यवस्था निर्माण केली जाईल. ३१ जुलैपूर्वी एमपीएससी सदस्यांची रिक्त पदे भरण्यात येतील, असे पवार यांनी विधानसभेत जाहीर केले होते. 

सूत्रांनी सांगितले की, तीन पदांसाठी तीन नावे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविली आहेत. राज्यपाल या नावांना कधी मान्यता देतात याबाबत उत्सुकता आहे. सदस्य पदासाठी आलेल्या अर्जांची छाननी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती करते. एमपीएससी सदस्य पदासाठीच्या पात्रतेचे निकष ११ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन आदेशात दिलेले आहेत. त्या आधारे ही छाननी करून एका पदासाठी चार नावांची शिफारस मुख्य सचिवांची  समिती मुख्यमंत्र्यांकडे करते व नंतर मुख्यमंत्री त्यातील एक नाव राज्यपालांकडे पाठवतात. या वेळी तीन सदस्यांसाठीची तीन नावे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठविल्याचे कळते. एमपीएससीचे अध्यक्ष सतीश गवई हे पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नवे अध्यक्ष निवडण्याची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल.

शासनाच्या परवानगीची MPSC ला प्रतीक्षा
गट ‘ब’च्या अधिकाऱ्यांची पदभरती करण्यासाठी संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा घेण्याकरिता परवानगी द्या, असे पत्र मे २०२१ मध्ये आणि त्यानंतरही एकदा एमपीएससीने राज्य सरकारकडे पाठविले. मात्र, अद्याप शासनाने परवानगी दिलेली नाही. महामारीच्या कायद्यानुसार परीक्षा घेण्यासाठी शासनाची परवानगी लागते. गट ‘ब’च्या अधिकारी पदासाठी ४ लाख उमेदवारांचे अर्ज आलेले होते. 

२०२० च्या पदभरतीचे मागणीपत्रच नाही
एमपीएससीने कोणत्या आणि किती पदांची भरती प्रक्रिया राबवायची याचे मागणीपत्र राज्य शासनाकडून दरवर्षी येते. २०२० मधील पदभरतीचे मागणीपत्र अद्याप शासनाकडून एमपीएससीला गेलेले नाही. एमपीएससीने त्याबाबत दोनवेळा सरकारकडे विचारणा केली. दरवर्षी साधारणत: सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान शासनाकडून मागणीपत्र येत असते. मात्र आता ऑगस्ट आला तरी गेल्या वर्षीचे मागणीपत्र शासनाकडून गेलेले नाही.

जीआर म्हणतो, १५ सप्टेंबर!

शासकीय सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठीचे प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत विविध विभागांनी एमपीएससीकडे पाठवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यंतरी एका बैठकीत दिले होते. मात्र, ३० जुलै रोजी शासन आदेश काढण्यात आला की, ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी पदभरतीबाबतची मागणी पत्रे एमपीएससीकडे पाठवावीत.

Web Title: CM Uddhav Thackeray Sent 3 name list for MPSC Member Post to Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.