मुबंई - महाराष्ट्राचा अनुभव घेताना अन्य राज्याचा अनुभव काही फार वेगळा नाही. अजून किती काळ कोरोना संकट चालेल हे सांगता येत नाही. कोविडनंतर देखील पोस्ट कोविड तक्रारी आहेत. कुटुंबातील लोकं गेली. कर्ता माणूस गेला आहे, रोजगार गेले आहेत, अनेक रोजगार बुडाले आहेत. रोजीरोटी मंदावली आहे. पोस्ट कोविडनंतर माझं काय होणार या चिंतेत देशवासी आहेत. अशा वातावरणात स्वबळाचा नारा ऐकला तर लोकं जोड्यानं हाणतील. हा विचार आपण केला नाही तर अराजकता मोठा शब्द ठरेल परंतु अस्वस्थतेकडे चालला आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, सर्व पक्षांनी राजकारण बाजुला ठेवून जर अर्थकारणाची घडी बसवण्याकडे लक्ष नाही दिले तर ते योग्य नाही. पहिल्या, दुसर्या लाटेच्या आठवणी सुद्धा नकोशा वाटतात. आजही रात्री अपरात्री फोन आला की धस्स होतं. परंतु प्रशासनाची मेहनत, जनतेची मदत शिवसैनिकांची समाजसेवा त्यामुळे दुसऱ्या लाटेतून सावरू शकलो. खुनखराबा करणे हा शिवसैनिकाची ओळख नाही परंतु अन्यायावर वार करणे आहे. रक्तपात नाही तर रक्तदान करणे ही शिवसैनिकांची ओळख आहे. आरोप करणार्यांपैकी कितीजणांची ही ओळख आहे? हजारो शिवसैनिकांनी रक्तदान केले. तेव्हा विचारत नाही की हे रक्त कुणाला दिलं जाणार. हे शिवसेनेच हिंदुत्व आहे. प्रत्येक आपत्तीत पहिला धावून जातो तो शिवसैनिक. बदनामी करणं सुरु आहे. जो आरोप करतोय ते कोण? तुमची ओळख काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कोरोनामुक्तीचा कार्यक्रम
वर्धापन दिनी राजकीय कार्यक्रम देण्याऐवजी कोरोना मुक्तीचा कार्यक्रम देणारे कोणी नसतील. कोरोना मुक्ती हा एक उपक्रम न राहता चळवळ निर्माण व्हायला हवी. कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत जनसहभाग येत नाही तोपर्यंत तो यशस्वी होत नाही. कोरोनातुन बाहेर पडण्यासाठी प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत यात सहभागी होत नाही तोपर्यंत हे कठीण नाही तर अश्यक्य आहे. सत्तेसाठी लाचार होणार नाही, परंतु उगाचच कोणाची पालखी वाहणार नाही. आम्ही आमच्या पाऊलावर खंबीरपणे पुढे वाटचाल करू ही शिवसेनेची ताकद, हे शिवसेनेचे ब्रीद! शिवसेना ही एक संघटना नाही, तो एक विचार आहे. तो पुढे जात राहणार आहे असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
हिंदुत्व कोणाचं पेटेंट नाही
हिंदुत्व कोणाचं पेटेंट नाही, हिंदुत्व आमच्या ह्दयात आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे. युती करून आघाडी केली म्हणून हिंदुत्व सोडलं असं होत नाही. राज्याचा विकास करणं आणि गोरगरिबांना न्याय देणे यासाठी आघाडी केली म्हणजे हिंदुत्व सोडलं असा अर्थ होत नाही. राजकारण आता बदलत चाललं आहे. कोरोनाच्या संकटकाळात राजकारण चाललं आहे त्याला विकृतीकरण म्हणतात. सत्ता पाहिजे म्हणून हे चाललं असेल तर सत्ता घ्यावी. माझ्यासाठी सत्तास्थापना महत्त्वाची नाही. पण आव्हान आलं ते स्वीकारलं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपाला काढला आहे.
शिवसेनेचे राजकारण हापापलेपणाचं नाही
तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत म्हणून हे साध्य झालं. तुम्ही नसता तर मला एक पाऊलही पुढे जाता आला नसतं. रात्री अपरात्री कोणाचा फोन आला तरी धस्स होतं, प्रशासकीय काम आणि शिवसैनिकांची मेहनत यामुळे दुसऱ्या लाटेवर आपण यश मिळवलं आहे. शिवसेनाप्रमुखांचे भाषण व्हायरल होत आहे. समोरचा फटकन् आवाज आला तर आपला ताडकन् आवाज आला पाहिजे. शिवसेनेची ओळख ही रक्तपात करणारी नाही तर रक्तदान करणारी आहे. आरोप करणाऱ्यांची काय ओळख आहे? रक्तसाठा कमी होत चालला आहे असं आवाहन केल्यानंतर शिवसैनिक हजारो बाटल्या रक्तदान करून अनेकांचे जीव वाचवले. रक्ताच्या बाटल्या देताना ते रक्त कोणाला जातंय हे विचारत नाही. आमचं रक्तदान हे सर्वांसाठी आहे. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक मदतीला धावतात. बदनामी करणारे बदनामी करत राहतील. आरोप करणारे कोण आहेत? तुझं चारित्र्य स्वच्छ आहे का? आरोप करणारे आरोप करून पळून जातात. आम्ही आमच्या रुबाबात चाललो आहेत. शिवसेनेचे राजकारण हापापलेपणाचं असतं तर ती अजिबात टिकली नसती. शिवसेना कशाच्या जोरावर टीकली असेल तर शिवसेनाप्रमुखांच्या विचारावर पुढे जात चालली आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.